नवी मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपच्या सांगण्यावरून ईडी काम करीत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. बेहीशोबी मालमत्ता कमविणाऱ्या भाजपातील 120 लोकांची यादी आपल्याकडे असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केल्यानतंर याला रामदास आठवले यांनी पलटवार केला आहे. संजय राऊत यांच्याकडे भाजपातील नेत्यांची यादी असल्यास त्यांनी त्वरीत ती ईडीकडे द्यावी, असे आवाहन आठवले यांनी दिले आहे.


भाजपच्या सांगण्यावरून ईडी काम करीत नसल्याचे स्पष्टीकरण रामदास आठवले यांनी यावेळी दिले. कामोठे येथे आरपीआयचा कोकण विभागाचा मेळावा घेण्यात आला होता. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आठवले यांनी महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला, दलितांवर अन्याय होत असल्याचेही यावेळी आठवले यांनी सांगितले.


काय आहे प्रकरण?


वर्षा राऊतांना आलेली ईडीची नोटीस ही पीएमसी बँकेतील 55 लाख रुपयांच्या व्यवहाराप्रकरणी आहे. यासंबंधी ईडीला वर्षा राऊत यांची चौकशी करायची आहे. वर्षा राऊत यांच्या पीएमसी बँक खात्यामधून काही आर्थिक व्यवहार झाले होते. हे सर्व प्रकरण एचडीआयएल या कंपनीशी संबंधित असल्याचा संशय ईडीला आहे. पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं एचडीआयएलच्या सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना अटक केली होती.


वाधवान कुटुंबाने या बँकेकडून हजारो कोटी रुपयांचं कर्ज काढलं होतं आणि त्याची परतफेड केली नाही. या वाधवा कुटुंबाच्या जवळचे असणारे प्रवीण राऊत हे संजय राऊताच्या खास मित्रांपैकी एक असल्याचं सांगण्यात येतंय. प्रवीण राऊतांची पत्नी माधुरी यांच्या अकाउंटवरुन 55 लाख रुपये संजय राऊतांच्या पत्नीच्या अकाउंटवर ट्रान्सफर करण्यात आले होते. हा पैसा का ट्रान्सफर करण्यात आला याची माहिती ईडीला हवी आहे. यासाठी ईडीने त्यांना नोटीस पोठवली असल्याचं समजतंय.


संबंधित बातमी :
PMC Bank Scam | संजय राऊतांच्या मागे ईडी का लागलीय? नेमका काय आहे 55 लाखांचा व्यवहार?


'पुराव्यानिशी आरोप सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जा' : संजय राऊत


Atul Bhatkhalkar | 'सामना'च्या अग्रलेखातून भाजप नेत्यांवर टीका; आमदार अतुल भातखळकर यांचं उत्तर