मुंबई : चेंबूर येथील एसआरव्ही रूग्णालयात एका कोरोनाबाधित महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत. सिझेरियन पद्धतीने ही प्रसूती करण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे. विशेष म्हणजे, करोना उद्रेकाच्या परिस्थितीमध्ये योग्य पद्धतीने काळजी घेऊन प्रसूती केल्याने आई आणि बाळ दोघांनाही धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. शाहीन शेख (नाव बदललेले) असं या गर्भवती महिलेचे नाव आहे. ही महिला कुटुंबियांसह कुर्लामध्ये राहणारी आहे.


कुटुंबात नवीन पाहुणा येणार यामुळे संपूर्ण कुटुंब उत्साहात होते. परंतु, सरकारी प्रोटोकॉलनुसार या महिलेची 38 व्या आठवड्यात कोविड-19 चाचणी करण्यात आली. ही चाचणी पॉझिटीव्ह आल्याने महिलेसह कुटुंबियांच्या चिंतेत भर पडली. कुटुंबात कोणालाही कोरोनाचा संसर्ग नसताना शेख यांना लागण झाल्याने कुटुंबीय घाबरून गेले होते. नेमकं काय करावं आणि कुठे जावं हेच त्यांना कळत नव्हते. अशा अवघड परिस्थितीत चेंबूरच्या टिळक नगरातील एसआरव्ही हॉस्पिटलमधील अग्रगण्य स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतिशास्त्रज्ञ डॉ. अंजली तळवलकर यांनी या कुटुंबांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला.


Corona Update | राज्यात आज 1008 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, एकट्या मुंबईत 751 रुग्ण


वेळीच काळजी घेतल्याने धोका टळला
कोरोनाची लागण झाल्याने चिंतेच पडलेल्या या कुटुंबियांचे समुपदेशन केल्यानंतर या गर्भवती महिलेला तातडीने एसआरव्ही रूग्णालयात दाखल करण्यात आले. या रूग्णालयात कोविड-19 रूग्णालयात विशेष आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याठिकाणी या महिलेवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. या महिलेला शस्त्रक्रिया खोलीसह सर्व सुविधा उपलब्ध केल्या गेल्या. या महिलेची 28 एप्रिल रोजी सिझेरियन प्रसूती करण्यात आली. ही प्रसूती यशस्वी झाली असून या महिलेने मुलीला जन्म दिला आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतिशास्त्रज्ञ डॉ. अंजली तळवलकर यांच्यासह सहाय्यक सर्जन डॉ. श्रीराम गोपाल आणि भूलतज्ज्ञ डॉ. अवंती भावे यांनी ही प्रसूती यशस्वी केली आहे. बाळ आईच्या संपर्कात येणार नाही, यासाठी तातडीने तिला स्वतंत्र अतिदक्षता विभागात ठेवले आहे. एनआयसीयू विभागाचे प्रमुख डॉ. धीरेन कालवाडिया यांच्या देखरेखीखाली मुलीवर उपचार सुरू आहे.


Lockdown3 | महाराष्ट्रात अंतर्गत प्रवास करण्यासाठी राज्य सरकारकडून नवीन नियमावली


बाळाला कोरोनाचा संसर्ग नाही
यासंदर्भात बोलताना एसआरव्ही हॉस्पिटलमधील अग्रगण्य स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतिशास्त्रज्ञ डॉ. अंजली तळवलकर म्हणाल्या की, शाहीन या कोरोनाबाधित गर्भवती महिलेची यशस्वी प्रसूती करण्यात आली आहे. ही महिला कोरोना संक्रमित असूनही योग्य देखरेखीमुळे तिच्या बाळाला या आजाराचा संसर्ग झालेला नाही. त्यामुळे गर्भवती महिलांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घाबरून जाऊ नयेत. आतापर्यंत मला अनेक गर्भवती महिला याबाबत वारंवार प्रश्न करतात. या सर्व महिलांना मला हेच सांगायचे आहे की, माता जरी कोरोनाबाधित असली तरी गर्भातील बाळाला याचा संसर्ग होण्याची शक्यता फार कमी आहे म्हणून घाबरू नका. सध्या आईच्या दुधात विषाणूचा पुरावा नाही. हा विषाणू श्वासोच्छवासाच्या थेंबाद्वारे पसरतो हे लक्षात घेता, आईंनी आपले हात धुवावेत आणि मुलांच्या विषाणूचा धोका कमी करण्यासाठी फेस मास्क घालणं गरजेचं आहे. बाळाला बाटलीने दुध पाजताना आईने हात स्वच्छ धुवावेत. याशिवाय गर्भवती महिलांनी रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी योग्य तो पोषक आहार घेणं गरजेचं असल्याचे त्यांनी सांगितले.


Lockdown Extension | लॉकडाऊन वाढवल्याबाबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया