मुंबई : उद्यापासून सर्व महिलांना लोकलमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. रेल्वे आणि राज्य सरकारच्या नाराजी नाट्यानंतर रेल्वेने मुभा दिली आहे. मुंबई लोकलमधून क्यूआर कोडशिवाय महिला प्रवाशांना प्रवास करण्याची रेल्वेनी परवानगी दिली आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत आणि सायंकाळी 7 नंतर महिलांना प्रवास करता येणार आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्वीट करत या विषयी माहिती दिली आहे.


आपल्या ट्वीटमध्ये पियुष गोयल म्हणाले, मला घोषित करण्यास आनंद होत आहे की, उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना स.11 ते दु.3 दरम्यान व सायं.7 नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे.रेल्वेची नेहमीच तयारी होती त्यामुळे आज मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत.






16 तारखेला राज्यसरकारने पहिले पत्र रेल्वेला पाठवलं होत. त्यामध्ये महिला प्रवाशांना ज्या, अत्यावश्यक सेवेत नाहीत, त्यांना देखील लोकलमध्ये प्रवासाची मुभा द्यावी अशी विनंती करण्यात आली. त्यावर लगेच रेल्वेने उत्तर पाठवत एकूण किती महिला प्रवासी असतील आणि गर्दी होऊ नये यासाठी कोणती कार्यपद्धती अवलंबावी याची माहिती राज्य सरकारकडून मागितली होती.