मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील नाणारमधील प्रकल्पाला तीव्र विरोध होत आहे. मात्र हा विरोध झुगारत सोमवारी सौदी अरामको आणि एडनॉक कंपन्यांमध्ये तीन लाख कोटींच्या सामंजस्य करारावर नवी दिल्लीत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावर बोलताना उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.
नाणार प्रकल्पाचा सामंजस्य करार झाल्याचं आपल्याला माध्यमांतून कळाल्याचे देसाई यांनी सांगितले. आम्हाला याबाबतची कोणतीही पूर्वसूचना दिली गेली नाही. केंद्र सरकारमध्ये अनंत गीते हे आमचे मंत्री आहेत. त्यांनाही याची कोणतीही कल्पना दिली गेली नसल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले.
आम्ही जर तेथे असतो किंवा त्या कार्यक्रमाला हजेरी लावली असती तर सगळा दोष आमच्यावर आला असता. जनता ही शांतता पूर्ण आंदोलन करत आहे. पण त्यांची अजून परीक्षा घेणे योग्य नाही. तसेच प्रकल्प रेटायचा प्रयत्न केल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा इशारा सुभाष देसाई यांनी दिला.
या प्रकल्पाची निर्मिती आणि विकास करण्यासाठी सोमवारी सौदी अरामको कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्यकार्यकारी अधिकारी अमीन एच. नसीर आणि संयुक्त अरब अमीरात (युएई) चे राज्यमंत्री आणि एडनॉक समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुल्तान अहमद अल जबेर यांनी धर्मेंद्र प्रधान आणि युएईचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन जायेद बिन सुल्तान अल नहयान यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
धर्मेंद्र प्रधान उद्धव ठाकरेंना भेटणार
नाणार प्रकल्पाला कोकणातून मोठा विरोध आहे. ग्रामस्थांच्या विरोधाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाही पाठिंबा आहे. मात्र याबाबत आपण स्वतः उद्धव ठाकरेंशी बोलू आणि ग्रामस्थांच्या जमीन अधिग्रहणाच्या समस्या आहेत, त्यावर बोलू, असं धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं.
हा प्रकल्प उभा करताना ग्रामस्थांच्या मताचा पूर्णपणे आदर केला जाईल आणि सर्वांसोबत चर्चा केली जाईल, असंही धर्मेंद्र प्रधान म्हणाले.
नाणार प्रकल्प रेटायचा प्रयत्न केल्यास मंत्रिपदाचा राजीनामा : सुभाष देसाई
एबीपी माझा वेब टीम Updated at: 26 Jun 2018 05:41 PM (IST)