मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या एलएलएम प्रवेश प्रक्रियेत गोंधळ झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. प्रवेश प्रक्रियेच्या अखेरच्या फेरीत रिक्त राहिलेल्या जागा लपवल्याने परीक्षेत गुण कमी असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्याचा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे.
डिसेंबर 2020 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या एलएलएम प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. मागील पाच महिन्यांपासून प्रवेश प्रक्रिया सुरु असून येत्या 2 जूनला विद्यापीठ परीक्षा घेणार आहे. मागील आठवड्यात या परीक्षेची सहावी आणि अंतिम फेरी घेण्यात आली. यामध्ये वेबसाईटवर सुरुवातीला कमी रिक्त जागा दाखवण्यात आला.
मात्र, ऑनलाईन व्हिसीद्वारे प्रत्यक्षात काऊन्सलिंग राऊंड सुरु झाला तेव्हा वेबसाईटवर दाखवलेल्या जागांपेक्षा जास्त जागा रिक्त असल्याचा निदर्शनास आलं. प्रवेश परीक्षेत चांगले गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांपेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना यामध्ये प्रवेश मिळाल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.
आता प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्याने अनेक विद्यार्थी अजूनही प्रवेशापासून वंचित असून 2 जून रोजी या एलएलएम अभ्यासक्रमाची परीक्षा आहे. त्यामुळे शेवटची फेरी परत घेऊन मेरिटनुसार रिक्त जागांवर प्रवेश मिळावे आणि एलएलएमची परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून कुलगुरु, राज्यपाल यांच्याकडे केली जात आहे.
विद्यापीठाने आरोप फेटाळले
मात्र, विद्यार्थ्यांनी केलेले हे आरोप विद्यापीठाने फेटाळले आहेत. विद्यार्थी सांगत असलेला असा कोणताही गोंधळ झालेला नाही, असं विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे.