मुंबई : विद्यापीठातील विद्यार्थ्यांना परदेशात पुढील शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी त्यांचे शैक्षणिक कागदपत्रे आता ऑनलाईन साक्षांकित करुन मिळणार आहेत. या संगणकीय साक्षांकन प्रक्रियेचे उद्घघाटन आज राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह शिवसेना उपनेते सचिन अहिर उपस्थित होते. अ-6 या शासकीय निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या या उदघाटन सोहळ्यास मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी, कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांच्यासह व्यवस्थापन परिषद आणि अधिसभेचे सदस्य उपस्थित होते.

या डिजीटल सेवेचे उद्घाटन करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबई विद्यापीठाने कमीत कमी वेळेत आणि अत्यल्प खर्चात विद्यार्थ्यांना ऑनलाईन साक्षांकनाची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा विद्यार्थी केंद्रीत महत्वपूर्ण निर्णय घेतला असून ही अत्यंत स्वागताहर्य बाब आहे. विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठ विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या सुविधेचा खूप मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कालपरत्वे बदलणाऱ्या शिक्षण पद्धतीनुसार विद्यापीठाने कालसुसंगत अभ्यासक्रमांची निर्मिती करण्यावर भर देण्याची गरज असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केले. मुंबई विद्यापीठ हे देशातील सर्वात जुने विद्यापीठ असून या विद्यापीठाच्या नावलौकिकासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. विद्यापीठातील नविन उपक्रमांना शासनाच्या माध्यमातून सर्वोतोपरी मदत केली जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले. तर विद्यापीठाच्या उत्कर्षासाठी समाजातील सर्वच घटकांनी प्रयत्नशील राहण्याची गरज असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेवर सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे अध्यक्ष म्हणून नामनिर्देश

विद्यार्थ्यांना या सुविधेचा मोठा लाभ
संगणकीय सांक्षाकन प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांना तीन ते चार दिवसांत कागदपत्रे ऑनलाईन साक्षांकित करुन दिली जाणार तसेच पुढील प्रक्रियासुध्दा विद्यापीठामार्फत केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कागदपत्रांची सत्यता तपासणी आणि चौकशी यापासून सुटका मिळणार आहे. त्याचबरोबर मुंबई विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करुन परदेशात स्थायिक झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा या सुविधेचा मोठा लाभ होणार आहे.

मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयाची अमलबजावणी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत केली जाणार आहे. यासाठी संकेतस्थळावर स्वतंत्र लिंक उपलब्ध करुन दिली जाणार असून विद्यार्थ्यांना या सुविधेचा घरबसल्या लाभ घेता येणार आहे. आजमितीस वर्षाला सुमारे दहा हजार विद्यार्थी त्यांची शैक्षणिक कागदपत्रे सांक्षाकित करण्यासाठी विद्यापीठाकडे अर्ज करीत असल्याचे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील यांनी सांगितले.

Yes Bank Crisis | सर्वसामान्यांसह नागपूर विद्यापीठ, पिंपरी पालिकेचे कोट्यवधी अडकले