मुंबई : इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी चालून आली आहे. येत्या 28 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर दरम्यान 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' (FCFS) तत्त्वावर प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. अकरावी प्रवेशासाठी कॉलेजमध्ये पुरेशा जागा उपलब्ध असून कुठलाही इच्छुक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही. सद्यस्थितीत प्रवेश प्रक्रियेच्या चार फेऱ्यांअंती सुमारे 3 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला आहे. मात्र, अजूनही काही विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये कॉलेज मिळाले नसल्याने अशा विद्यार्थ्यांसाठी ही विशेष प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या फेरीमध्ये कोणते विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र असतील?
प्रवेश अर्जाचा भाग-1 भरलेले आणि अद्याप कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित न केलेले विद्यार्थी या फेरीसाठी पात्र असतील. ज्या विद्यार्थ्यांनी आधी मिळालेले कॉलेज मधील प्रवेश रद्द केले आहे किंवा प्रवेश नाकारला आहे असे विद्यार्थी या फेरीमध्ये सहभागी होऊ शकतील. राज्य मंडळाच्या दहावी परीक्षेत एटीकेटीची सुविधा मिळालेले विद्यार्थी सुद्धा या फेरीसाठी पात्र असतील.
या फेरीसाठी विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांनुसार त्यांचे सात गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे यामध्ये,
- 90 टक्के आणि 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळालेले विद्यार्थी
- 80 टक्के ते 80 टक्के पेक्षा जास्त गुण मिळालेले विद्यार्थी
- 70 टक्के ते 70 टक्के पेक्षा जास्त गुण मिळालेले विद्यार्थी
- 60 टक्के ते 80 टक्के पेक्षा जास्त गुण मिळालेले विद्यार्थी
- 50 टक्के ते 50 टक्के पेक्षा जास्त गुण मिळालेले विद्यार्थी
- दहावी उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी
- दहावी परीक्षेत एटीकेटी सुविधा मिळालेले विद्यार्थी
28 सप्टेंबर पासून विद्यार्थ्यांना गटानुसार प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन सद्यस्थितीत रिक्त जागांवर आपली प्रवेश निश्चित करायचे आहेत. विद्यार्थी वरील पैकी गुणांनुसार कोणत्या गटांमध्ये येतो? हे बघून त्यानुसार संकेत स्थळावरील वेळापत्रक पाहून कॉलेजमध्ये निश्चित करायचे आहेत.