मुंबई : मुंबईतील गोवंडीच्या शिवाजीनगरमध्ये अल्पवयीन विद्यार्थ्याने शिक्षिकेची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली आहे. मृतक शिक्षिकेचं नाव आयेशा अस्लम हुसीए असं आहे. 30 वर्षीय आयेशाकडे हा विद्यार्थी शिकवणी साठी येत होता तर ही शिक्षिका अल कौसर उर्दू हायस्कूलमध्ये शिक्षिका होती.


सोमवारी रात्री काही मुलं शिकवणीसाठी आली होती. त्यावेळी हा अल्पवयीन आरोपी मुलगा सुद्धा आला होता. रात्री आठ वाजता शिकवणी संपल्यावर सर्व मुलं घरी गेली. त्यानंतर या मुलाने या शिक्षिकेच्या घरातील चाकू घेतला आणि तिला काही कळायच्या आत तिच्या पोटात पाठीत आणि मानेवर अनेक वार केले. शिक्षिका आयेशा रक्ताच्या थारोळ्यात पडली.

शेजाऱ्यांनी या प्रकाराची माहिती शिवाजीनगर पोलिसांना दिली. त्यावेळी पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी तिला राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी नेलं. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं असून कोणत्या कारणास्तव ही हत्या केली याचा तपास सुरु असल्याचे सांगितले आहे.