मुंबई : निवडणुकीत पराभव काँग्रेस पक्षाला मिळणाऱ्या निधीत एकाच वर्षात पाच पटीने वाढ झाल्याचं समोर आलं आहे. 2017-18 पेक्षा 2018-19मध्ये काँग्रेसला मिळालेल्या पक्षनिधीत पाच पटीने वाढ झाल्याचा अहवाल काँग्रेसने निवडणूक आयोगाला दिला आहे. काँग्रेसला 2017-18 मध्ये 26 कोटी रुपये पक्षनिधी मिळाला होता. तर 2018-19 मध्ये 146 कोटी म्हणजे पाच पट निधी मिळाला.

तर 2014 मध्ये सत्तेत आल्यापासून सगळ्यात जास्त पक्षनिधी भाजपला मिळाला आहे. 2017-18 मध्ये भाजपला 1027 कोटी रुपये पक्षनिधी मिळाला. 2017-18 या एका वर्षात भाजपला 400 कोटी रुपयांहून अधिक पक्षनिधी मिळाला होता. परंतु 2018-19 च्या पक्षनिधीचा अहवाल मात्र भाजपने निवडणूक आयोगाला अद्याप सादर केलेला नाही.

राजकीय पक्षांचा बराचसा खर्च हा लोकांनी दिलेल्या देणग्यांवर चालतो. त्यामुळे लोकांकडून मिळालेला पैसा कसा आणि कुठे खर्च केला जातो याची माहिती सार्वजनिक करणं महत्त्वाचं ठरतं. राजकीय पक्षांनी त्यांचं आर्थिक उत्पन्न आणि खर्चाचा ऑडिट रिपोर्ट भारतीय निवडणूक आयोगाकडे जमा करणं,  नोव्हेंबर 2014 पासून बंधनकारक आहे.

राजकीय पक्षांचा निधी हा मुख्यत्वे लोकांनी दिलेल्या देणगीतून मिळालेला असतो. इलेक्टोरल बॉण्ड्स, आजीवन सहयोग निधी, वैयक्तिक देणगी, मोर्चा आणि सभेसाठी दिलेल्या देणग्या, तसंच आमदार आणि खासदारांनी दिलेल्या देणग्या यांचा समावेश आहे.