शाळेनं मात्र आपण अद्याप कुणालाही हॉल तिकीट दिलेलं नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राहुलला हॉलतिकीट नाकारण्याचा प्रश्नच येत नसल्याचं सांगत पालकांच्या आरोपांच खंडण केलं आहे.
दहावीला बसलेला अवघ्या 17 वर्षांचा राहुल सोमवारी दहावीच्या हॉलतिकीटाबाबत चौकशीसाठी तुळींज येथील कांचन हायस्कूल या शाळेत गेला. त्यानंतर त्याचं फोनवरुन वडिलांशी बोलणं झालं. मात्र घरी आल्यावर तो एकदम गप्पच झाल्याचं कुटुंबीय सांगतात.
घरी आल्यावर बहिणीला राहुलने क्लासमध्ये पाठवलं, मात्र ती क्लासमधून परत आली तेव्हा त्याने पंख्याला लटकून आपलं जीवनच संपवलं होतं.
राहुल नववीची परीक्षा नापास झाला होता. त्यामुळे तुळींज येथील कांचन हायस्कूलमधून इयत्ता दहावीत 17 नंबरचा फॉर्म भरुन तो बाहेरुन परीक्षा देत होता. तोंडी परीक्षेला न बसल्याने शाळेने तीनशे रुपये दंड मागितल्याचं त्याने आई-वडिलांना सांगितलं होतं.
त्याचप्रमाणे परीक्षेचं हॉलतिकीटही शाळा देण्यास तयार नसल्याचं त्यानं म्हटलं होतं. शाळेनं आपला अपमान केल्याच्या भावनेतून तो तणावाखाली गेल्याचा आरोप राहुलच्या आई-वडिलांनी केला आहे.
शाळेनं मात्र राहुलच्या आई-वडिलांचे आरोप फेटाळून लावले आहेत. शाळेनं अद्याप कुणालाही दहावीची हॉलतिकीट्स दिली नसल्याचा निर्वाळा दिला आहे. राहुल 27 तारखेला हॉलतिकीटासाठी आला होता. त्याने कोणतीही फी भरली नव्हती व शाळेनं आकारलीही नव्हती.
तुझी तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा दे आणि बोर्डाने दिलेल्या स्वाध्यायकृती पुस्तिका जमा कर, त्याचप्रमाणे आवश्यक त्या सर्व गोष्टींची पूर्तता करण्यास त्याला सांगण्यात आल्याचं शाळेने सांगितलं.
तुळींज पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. वडीलांच्या तक्रारीनुसार राहुल परीक्षेच्या तणावाखाली होता की शाळेच्या मानसिक त्रासामुळे त्याने आत्महत्येचं पाऊल उचललं, याबाबत तपास करत आहेत.