मुंबई : आपली एखादी वस्तू हरवली किंवा चोरीला गेल्यास ती परत मिळवण्यासाठी कित्येक वर्ष वाट पाहावी लागते. बऱ्याचदा कंटाळून ती वस्तू परत मिळण्याची आशाही आपण सोडून देतो. मात्र उशिरा का होईना चोरीला गेलेली वस्तू एक नाही, दोन नाही तब्बल 21 वर्षांनी पुन्हा मिळाली तर.. धक्का बसेल ना..? होय हा सुखद धक्का विरारच्या राजश्री सुनील करजावकर यांना बसला आहे.


विरार पूर्व द्वारका नगरी, फुलपाडा रोड या परिसरात राहणाऱ्या 47 वर्षीय राजश्री सुनील करजावकर यांची तब्बल 21 वर्षाआधी ट्रेनच्या गर्दीत चोरलेली कानातील चैन पोलिसांनी घरी आणून दिली. यावेळी राजश्री करजावकर यांना नक्कीच आनंदाचा सुखद धक्का बसल. त्यांनी विचार देखील केला नव्हता की, 21 वर्षाआधी चोरीला गेलेली कानातील चैन त्यांना इतक्या वर्षांनी परत मिळेल.


राजश्री करजावकर 1999 साली कामानिमित्त अंधेरीला आल्या होत्या. लोकलमध्ये चढताना त्याची 4 ग्रॅमची कानातील चैन चोरुन चोराने पळ काढला होता. यात वांद्रे रेल्वे पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता. पोलिसांनी याचा सखोल तपास करून, चोराला पकडून त्याच्याकडून राजश्री यांची सोन्याची चैन मिळवली. वांद्रे पोलिसांनी राजश्री करजावकर यांना त्यांच्या राहत्या घरी येऊन तब्बल 21 वर्षानंतर कानातील चैन त्यांच्या स्वाधीन केली. राजश्री यांनी रेल्वे पोलिसांचे आभार मानत आपला आनंद व्यक्त केला आहे.


याबाबत त्यांचा मुलगा प्रथमेश करजगावकर याने फेसबुक पोस्ट करत रेल्वे पोलिसांचे आभार मानले आहेत. 1999 साली आईचे रेल्वेत चोरी झालेले दागिने आज तब्बल 21 वर्षांनी परत मिळाले. शुक्रवारी म्हणजेच गणपतीच्या पूर्वसंध्येलादागिने मिळाल्याची खुशखबर रेल्वे पोलिसांकडून मिळाली होती. कायदेशीर प्रक्रियेनंतर अखेर आज पोलिसांनी दागिने घरपोच केले.
रेल्वेत एखादी गोष्ट चोरीला गेली की ती परत मिळण्याची शक्यता फार कमी असते. मात्र जीआरपीमध्ये आजही अनेक पोलिस एखाद्या गुन्ह्याचा प्रामाणिकपणे तपास करतात याचं हे उत्तम उदाहरण म्हणावं लागेल. गुन्ह्याचा छडा लावणाऱ्या GRP चे विशेष आभार, असं प्रथमेशनं म्हटलं आहे.