कोरोना काळात सर्वच नागरिक आपल्या सुरक्षिततेसाठी जमेल तेवढे उपाययोजना करत आहेत. त्यात वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर व इतर कर्मचारी हे सुरक्षिततेसाठी हॅन्डग्लोव्जचा वापर मोठ्या प्रमाणात करत असतात. वैद्यकीय क्षेत्रातील नागरिकांनी वापरलेले हेच हॅन्डग्लोव्ज जमा करून वॉशिंग मशीनमध्ये केमिकल टाकून हे हॅन्डग्लोव्ज धुवून त्याचा पुनर्वापर करणाऱ्या टोळीचा नवी मुंबई क्राईम ब्रांचने पर्दाफाश केलाय.
महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी कारवाई असून यामध्ये तब्बल 4 लाख वैद्यकीय वापर केलेले हॅन्डग्लोव्ज धुवून पुन्हा वापरात आणणाऱ्या टोळीचा मुख्य आरोपी प्रशांत सुर्वेला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत तब्बल 263 गोणी वापरलेले हॅन्डग्लोव्ज, ते धुण्यासाठी वापरण्यात आलेल्या 2 वॉशिंग मशीन व हॅन्डग्लोव्ज सुकविण्यासाठी वापरण्यात आलेले 3 ब्लोअर मशीन असा एकूण 6 लाख 10 हजार 720 रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपीने हा माल औरंगाबाद येथील वाळूज एमआयडीसी मधून आणला होता. त्यामुळे आता मराठवाड्यात ही टोळी कार्यरत आहे का? याचा तपास करण्यासाठी नवी मुंबई क्राईम ब्रॅंचची टीम औरंगाबादला जाणार आहे.
हे धुतलेले हॅन्डग्लोव्ज पुनर्वापरासाठी बिहार, राजस्थान, आसाम, कर्नाटक, आंध्र प्रदेश या ठिकाणी पाठवण्यात येणार होते. मात्र याची डिलिव्हरी व्हायच्या आधीच पोलिसांनी छापा टाकल्याने याचा भांडाफोड झाला आहे.