मुंबई: मुंबई महापालिकेचं घोडामैदान महिन्यावर येऊन ठेपलेलं असताना युतीचा पेच मात्र अद्याप कायम आहे. युतीबाबत भाजपकडून प्रतिसाद न आल्यानं शिवसेनेनं स्वबळासाठी तयारी सुरु केली आहे.


महापालिका निवडणुकीच्या उमेदवारांसाठी शिवसेनेनं पडताळणी सुरु केली आहे. तसंच उद्धव ठाकरे स्वतः नगरसेवक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. महत्वाचं म्हणजे मुंबई महापालिकेसह इतर ठिकाणीही खुद्द मुख्यमंत्री युतीसाठी आग्रही असल्याचं काल भाजपच्या सूत्रांनी म्हटलं होतं. मात्र, तरीही भाजपकडून प्रतिसाद मिळत नसल्याचं आता शिवसेनेच्या गोटातून बोललं जातं आहे.

प्रस्ताव आल्यास युतीसाठी तयार : राज ठाकरे

दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही आज मोठं वक्तव्य केलं आहे. 'युतीचा प्रस्ताव आल्यास यावेळी नक्की विचार करेन.' असं राज ठाकरे म्हणाले.

शिवसेनेसोबत युती करण्यासाठी मुख्यमंत्री आग्रही

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे युतीसाठी आग्रही असल्याचं समजतं आहे. ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी काल रात्री उशिरा विशेष बैठक घेण्यात आली. शिवसेनेशी कटुता न येता युती करावी अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत मांडली. विशेषत: जिल्हापरिषदेत युती करण्याचा आग्रह मुख्यमंत्र्यांनी केला होता.

त्यामुळे आता शिवसेना भाजपशी युती करणार की, स्वबळावर लढणार किंवा मनसेला सोबत घेणार? हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.

संबंधित बातम्या:

प्रस्ताव आल्यास युतीसाठी तयार : राज ठाकरे