मुंबई : पुण्यातील सीरम इंस्टिट्युटच्या अदर पुनावाला यांनी देशासाठी सध्याचा काळात खूप भरीव योगदान दिलंय. संपूर्ण देशासह जगासाठी एक संजीवनी ठरणारी 'कोविशिल्ड' ही लस त्यांच्या कंपनीनं तयार केली. त्यामुळे अशा व्यक्तीला जर धमक्या येत असतील तर ते फार गंभीर प्रकरण आहे. याची तातडीनं दखल घ्यायला हवी, असं मत गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केलं. 


कोविशिल्ड लस तयार करणाऱ्या पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांना धमकवणाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करा. या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश राज्याचे पोलीस महासंचालक आणि पुणे पोलीस आयुक्त यांना करण्याचे निर्देश द्यावेत. तसेच तातडीनं अदर पुनावाला आणि त्यांच्या कुटुंबियांना 'झेड प्लस' सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका अँड. दत्ता माने यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर गुरुवारी न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या सुट्टीकालीन खंडपीठापुढे सुनावणी झाली.


जर या याचिकेतील दाव्यांत तथ्य असेल तर त्याची चौकशी व्हायला हवी. मात्र त्याआधी पुनावाला आणि त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ सुरक्षा पुरवायला हवी. 1 जूनला होणाऱ्या पुढील सुनावणीत राज्य सरकारनं यावर सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देश हायकोर्टनं दिले आहेत.


देशात सध्या कोरोना लसींचा मोठा तुटवडा आहे. मुंबई आणि महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरण थांबत थांबत सुरू आहे. अश्यातच लसींच्या पुरवठ्यासाठी अदर पुनावाला यांना काही बड्या राजकिय व्यक्तींनी धमक्यांचे फोन केलेत. असा गौप्यस्फोट स्वत: अदर पुनावाला यांना युकेतील एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. या वृत्तानं भारतात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर पुनावाला यांनी तातडीनं याचं स्पष्टीकरण देत आपल्या बोलण्याचा विपर्यास केला गेला अशी सवरासावर केली. मात्र अदर पुनावाला हे सध्या आपल्या कुटुंबियांसोबत ब्रिटन मध्येच वास्तव्यास आहेत. त्यामुळे पुनावाला यांना धमकवणाऱ्या लोकांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अँड. दत्ता माने यांनी या याचिकेद्वारे केली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :