मुंबई : योगगुरु रामदेव बाबा यांच्या पतंजलीच्या उत्पादनांना सरकारी सेवा केंद्रात स्थान देण्यात येणार आहे. ‘आपले सरकार’ सेवा केंद्रामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये आधार, पॅन, पासपोर्ट सेवेपासून निवडणूक आयोगाच्या सेवांचा समावेश आहे. त्यातच आता रामदेव बाबांच्या पतंजलीला ई-कॉमर्समध्ये खास स्थान देण्यात आलं आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. इतर उद्योजक आणि विरोधकांनी सरकारच्या या निर्णयावर तीव्र विरोध दर्शवला आहे.
प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात ‘आपले सरकार’ सेवा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. 5 हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असल्यास 2 सेवा केंद्र स्थापन केले जातील. तर शहरी भागात 24 हजार लोकसंख्येमागे एक आणि नगरपंचायत भागात 5 हजारांहून अधिक लोकसंख्या असल्यास 2 केंद्र स्थापन केली जातील.
पतंजलीवरच मेहरबानी का? – धनंजय मुंडे
सरकारला केवळ पतंजलीचाच एवढा पुळका का आहे, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. ‘आपले सरकार’ मार्फत पतंजलीची उत्पादनं विकण्यास परवानगी देऊन सरकार पतंजलीवर मेहेरनजर दाखवत आहे. एकाच खाजगी कंपनीचे सरकारला इतकं प्रेम का? आपले सरकार सेवा केंद्राचे दुकानच करायचे असेल तर स्पर्धात्मक निविदा काढून इतर भारतीय कंपन्यांचीही उत्पादने विक्रीला ठेवा, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.