मुंबई : यंदा मुंबई तुंबली तर जबाबदारी राज्य सरकारची असेल. मुंबई महापालिका शहर तुंबण्याला जबाबदार राहणार नाही, असं विधान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केलं आहे.
राज्य सरकारने विकासाच्या नावावर शहरात ठिकठिकाणी खड्डे खोदून ठेवले आहेत. मुंबईत मेट्रोची कामं सुरु आहेत. यादरम्यान, पर्जन्यजलवाहिन्या उखडल्या गेल्या होत्या, त्या पूर्ववत करण्याची जबाबदारी संबंधित प्राधिकरणांची आहे. मेट्रोच्या कामामुळे जर मुंबई तुंबली तर जबाबदारी महापालिकेची नाही, असं महापौरांनी स्पष्ट केलं.
शहरातील नाल्यांची किती सफाई झाली ह्याची पाहणी आज महापौरांनी केली. परंतु मुंबईत अजूनही नालेसफाईचं काम सुरु आहे. आतापर्यंत मुंबईतली नालेसफाई 50% झाली आहे.येत्या काही दिवसात नाल्यांची 70 टक्के सफाई होईल, असं महापौरांनी सांगितलं. पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे.
येत्या दहा दिवसांत पुन्हा नालेसफाईचा पाहणी दौरा होणार आहे. तोपर्यंत काम पूर्ण झालं नाही तर संबंधित ठेकेदारांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिला आहे.
मान्सून दाखल होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक आहे. त्यामुळे त्याआधी मुंबईतील नाल्यांची सफाई करणं हे महापालिकेचं महत्त्वपूर्ण काम समजलं जातं. महापालिकेकडून दरवर्षी नालेसफाईबाबत मोठमोठे दावे केले जातात. तरीही मुंबईकरांना 26 जुलै आणि मागील वर्षाच्या 29 ऑगस्टसारख्या परिस्थितीचा सामना करावा लागतो.
मागील वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं. पावसामुळे मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये 13 जणांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला होता.
संबंधित बातम्या
मुसळधार पावसामुळे मुंबई तुंबली : महापौर
महापौर म्हणतात, मुंबईच्या अवस्थेला एकटी महापालिका जबाबदार नाही!
मुंबईत पाणी साचल्याचं दाखवा, तिथे अधिकाऱ्यांना घेऊन जातो: महापौर