मुंबई : मुंबईतील मेट्रोच्या मार्ग 10, मार्ग 11 आणि मार्ग 12 च्या अंमलबजावणीला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईतील मेट्रो 10 गायमुख ते शिवाजी चौक, मिरा रोडच्या अंमलबजावणीला मान्यता मिळाली आहे. तसंच मेट्रो 11 वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मेट्रो 12 कल्याण ते तळोजा या प्रकल्पांच्या अंमलबजावणीस मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर आणि सोपा होणार आहे.

मुंबई मेट्रो 10 चा मार्ग गायमुख ते मीरा रोड असेल. या प्रकल्पासाठी 4032 कोटींचा खर्च अपेक्षित असून या मार्गाची लांबी 20.756 किमी असेल. मेट्रो 11 मार्ग सीएसएमटी ते वडाळा असा असेल. ज्याची लांबी 12.774 किमी असेल, तर या प्रकल्पासाठी 6135 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मेट्रो 12 प्रकल्प कल्याण - तळोजा दरम्यान असेल, ज्याची लांबी 9.202 किमी असेल.

तसंच पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाच्या हिश्श्याचा व्यवहार्यता तफावत निधी उभारण्यासाठी शासकीय जमिनी पीएमआरडीएकडे वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली आहे.