मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने खुशखबरी दिली आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई क्षेत्रातून एसटीने 2225 बसेसची सोय केली आहे. कोकणातील नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असं आवाहन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केलं आहे.
गणपती उत्सव म्हणजे कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. एसटी, गणपती उत्सव आणि कोकणचा चाकरमानी यांचं एक अतूट नातं आहे. दरवर्षी एसटी महामंडळाकडून कोकणात जाण्यासाठी अतिरिक्त बसेसची सोय करण्यात येते.
येत्या 9 ऑगस्टपासून यासाठी संगणकीय आरक्षणाला सुरुवात होणार आहे. तर एक ऑगस्टपासून ग्रुप बुकिंग सुरु होईल. ग्रुप बुकिंग करण्यासाठी प्रवाशांची यादी घेऊन जवळच्या आगारात जावं लागेल.
8 सप्टेंबर 2018 ते 12 सप्टेंबर 2018 या कालावधीत नियमित वाहतुकीशिवाय या अतिरिक्त बस सोडण्यात येतील. 8 ते 9 सप्टेंबर या पहिल्या टप्प्यात एसटी वाहतूक सुरळीत होण्यासाठी मुंबई आणि उपनगरातील बसस्थानके आणि बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत असतील.
कोकणातील महामार्गांवर ठिकठिकाणी 'वाहन दुरुस्ती पथक ' (ब्रेक डाऊन व्हॅन) तैनात करण्यात येणार आहेत. तसेच प्रवाशांसाठी तात्पुरत्या स्वरूपाची स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत.
कोकणातील सावंतवाडी, मालवण, कणकवली, देवगड, विजयदुर्ग, राजापूर, लांजा, पाली, संगमेश्वर, रत्नागिरी, चिपळूण, गुहागर, खेड, दापोली, श्रीवर्धन, पेण, अलिबाग आणि आजूबाजूच्या परिसरात जाणाऱ्या गणेशभक्तांनी सुरक्षित प्रवासासाठी आपल्या प्रवासाची तारीख व वेळ ठरवून संबंधित आगारांशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
गणेशोत्सवात मुंबईहून कोकणात जाण्यासाठी 2225 अतिरिक्त बसेस
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Jul 2018 07:48 PM (IST)
कोकणातील नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असं आवाहन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केलं आहे.
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -