मुंबई: राज्य सरकार विशेषत: परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची महत्त्वकांक्षी शिवशाही बससेवा, दिवसेंदिवस त्रायदायक ठरत आहे. अपघातांचे वाढते प्रमाण तर आहेतच, मात्र चांगली सेवा देण्यातही शिवशाही कमी पडत आहे.


त्याचंच उदाहरण आज पुन्हा एकदा बोरिवलीत समोर आलं आहे.

उन्हाचा त्रास टाळण्यासाठी तसंच आरामदायी आणि गारेगार प्रवास व्हावा यासाठी शिवशाहीचं तिकीट काढलं, मात्र गाडीत बिघाड असल्याचं सांगत, महामंडळाने चक्क लाल डब्ब्याने प्रवास करण्यास सांगितलं.

प्रणाली जाधव यांनी बोरिवली ते देवरुख (रत्नागिरी) या मार्गावरील प्रवासासाठी शिवशाही बसचं तिकीट बूक केलं. प्रणाली आणि त्यांच्यासोबतच्या 9 जणांनी शिवशाहीचं अॅडव्हान्स तिकीट बुक केलं.



मात्र आज प्रवासाची वेळ आली त्यावेळी त्यांना भलताच अनुभव आला. आज सकाळी 7 वा बोरिवलीतील नॅन्सी कॉलनीवरुन सुटणारी शिवशाही बसमध्ये बिघाड झाल्याचं त्यांना सांगण्यात आलं.

बरं प्रणाली जाधव यांना बिघाड झालेल्या शिवशाहीऐवजी दुसरी शिवशाही बस येईल अशी आशा होती. मात्र झालं भलतंच. त्या शिवशाहीऐवजी त्यांना लाल डब्ब्यात बसण्यास सांगितलं.

मात्र इतके पैसे देऊन, अॅडव्हान्समध्ये तिकीट बूक करुन, लाल डब्ब्याने का जायचं, असा प्रश्न विचारत, प्रणाली जाधव यांनी लाल डब्ब्यातून जाण्यास नकार दिला. सध्या बोरिवली बस डेपोत 30 ते 35 जण तिथेच थांबून आहेत.

दुसरीकडे प्रवाशांना ज्या लाल डब्ब्याने प्रवास करण्यास महामंडळ सांगत आहे, त्या एसटीचा ड्रायव्हर नाईट शिफ्ट करुन आला आहे. त्यामुळे तो झोपण्यास गेल्याचं सांगण्यात येत आहे.  म्हणजे एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार किती असावा, हे या सर्व प्रकारावरुन दिसून येतं.

जर एसटी महामंडळ गंडवागंडवी करत शिवशाहीचं तिकीट काढणाऱ्यांना लाल डब्ब्यातून पाठवणार असतील, तर निश्चितच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या प्रकाराकडे लक्ष द्यायला हवं.

सुट्ट्यांमुळे सध्या लोक गावी जात आहेत. वाढत्या तापमानात प्रवास सुखद व्हावा यासाठी ते जास्त पैसे मोजत आहेत. मात्र एसटी महामंडळाकडून अशी फसवणूक होणार असेल, तर प्रवासी एसटीवर विश्वास का ठेवतील, असा प्रश्न आहे.