मुंबई : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. साताऱ्यात आयोजित करण्यात आलेला 'राजधानी महोत्सव' आणि इतर विषयांवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.


मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यासाठी उदयनराजे साताऱ्याहून मुंबईला आले होते. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर फडणवीस आणि उदयनराजे यांच्यामध्ये तासभर चर्चा झाली.

साताऱ्यामध्ये 25 ते 27 मे दरम्यान 'राजधानी महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री आणि बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत 'राजधानी महोत्सव' होणार आहे.

छत्रपती घराण्याकडून 27 मे रोजी संध्याकाळी 'शिवसन्मान पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री आणि अमिताभ बच्चन हा पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.