कल्याण : कल्याणमधील 104 वर्ष जुना पत्रीपूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेवर आज सहा तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात डोंबिवली आणि कल्याणदरम्यान लोकलच्या 140 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले आहेत. या काळात, गरज असेल तरच प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक सुरु होण्यापूर्वी सीएसएमटीहून कर्जतसाठी सकाळी 8.16 वाजता आणि कल्याणहून सीएसएमटीसाठी शेवटची जलद लोकल सकाळी 9.09 वाजता सोडण्यात येणार आहे. ब्लॉक संपताच लोकल सेवा पूर्ववत होतील. सीएसएमटी ते डोंबिवली आणि कल्याण ते कर्जत, कसारादरम्यान लोकल गाड्या नियमितपणे धावतील. त्याशिवाय काही विशेष लोकल फेऱ्याही सोडण्यात येणार आहेत.
मेल-एक्स्प्रेसच्या मार्गातही बदल
मेल-एक्स्प्रेस गाड्यांपैकी मनमाड एक्स्प्रेस, पंचवटी एक्स्प्रेस, मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस, जालना जनशताब्दी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय अन्य मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळा आणि शेवटचे थांबेही बदलले गेले आहेत.
कल्याण-डोंबिवलीतील प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेला जादा बसगाड्या सोडण्याची विनंती मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेवरही ब्लॉक
पश्चिम रेल्वेवरही चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रलदरम्यान सकाळी 10.35 पासून पाच तासांसाठी ब्लॉक घेऊन विविध कामे केली जातील. हा ब्लॉक अप आणि डाऊन जलद मार्गावर असेल.
कल्याणमध्ये जुना पत्रीपूल पाडण्यासाठी रेल्वेचा सहा तास ब्लॉक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Nov 2018 07:49 AM (IST)
ब्लॉक सुरु होण्यापूर्वी सीएसएमटीहून कर्जतसाठी सकाळी 8.16 वाजता आणि कल्याणहून सीएसएमटीसाठी शेवटची जलद लोकल सकाळी 9.09 वाजता सोडण्यात येणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -