मुंबई : आयआयटी मुंबईच्या प्लेसमेंटला काल पासून सुरवात झाली असून आज प्लेसमेंटच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा अनेक विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट झाल्या आहेत. यामध्ये सोनी जपान या कंपनीकडून यावर्षी आतापर्यत सर्वाधिक 1.15 कोटींची आतंरराष्ट्रीय ऑफर मिळाली आहे. दुसऱ्या दिवशीच्या सत्रात एकूण 16 कंपन्यांनी विद्यार्थ्यांना 64 हून अधिक ऑफर्स देऊ केल्या आहेत. आयआयटी मुंबईच्या प्लेसमेंटच्या पहिल्या दिवशी तब्बल 35 कंपन्यांनी विद्यार्थ्यांना ऑफर्स देऊ केल्या.
देशांतर्गत प्लेसमेंट्समध्ये सर्वाधिक ऑफर करणाऱ्या कंपन्यांमध्ये टेक्सास इन्स्ट्रुमेंट, गुगल, मायक्रोसॉफ्ट , मास्टरकार्ड आणि बोस्टन कन्सलटिंग ग्रुप यांचा समावेश होता. तर आंतरराष्ट्रीय ऑफर्स देणाऱ्या 21 कंपन्यांमध्ये ऑप्टिव्हर, होंडा (रिसर्च अँड डेव्हलपमेंट), टीएसएमसी यांचा समावेश होता. पहिल्या दिवशीच्या सत्रात 155 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
प्री प्लेसमेंट्स आणि पहिला दिवस पकडून आतापर्यंत आयआयटी मुंबईच्या 313 विद्यार्थ्यांची प्लेसमेंट्ससाठी निवड झाली असल्याची माहिती प्लेसमेंट्स सेलकडून देण्यात आली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्लेसमेंटवर परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र तरीही खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
दुसऱ्या दिवशीच्या आंतरराष्ट्रीय ऑफर्स
सोनी जपान- 1.15 कोटी
होंडा, जपान- 57.58 लाख
इनईसी जपान- 34.75 लाख
टीएसएमसी - 14.61 लाख
क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2021 मध्ये देशातील उच्च शिक्षण देणाऱ्या विद्यापीठ, संस्थांमध्ये आयआयटी मुंबईने पहिले स्थान मिळविले आहे. मुंबई आयआयटीने या रँकिंगमध्ये पहिल्या दोनशेमध्ये स्थान मिळवले असून मागील वर्षीच्या रँकच्या तुलनेत मात्र मुंबई आयआयटीची रँक यंदाच्या वर्षी घसरलेली पाहायला मिळाली. मागील वर्षी मुंबई आयआयटीने क्यूएस रँकिंगमध्ये 152 वा स्थान मिळवले होते. तर यावर्षी मुंबई आयआयटीची रँकही 20 ने घसरून 172 वा रँक प्राप्त झाला आहे