मुंबई : लॉकडाउनमुळं मुंबईत अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्याचं काम करणाऱ्या अभिनेता सोनू सूद वरुन राज्यात राजकारण सुरू झालंय. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोनू सूदच्या पाठीमागे दुसरचं कोणीतरी असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर सोनू याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. खुद्द संजय राऊत यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.
कोरोना व्हायरसच्या संकटात सरकारनं देशभरात लॉकडाऊनची घोषणी केली. त्यानंतर अनेक परप्रांतीय मजूर, कामगार मुंबईत अडकून पडले होते. हातात असलेलं काम गेल्याने आणि कोरोना सारख्या महामारमुळे त्यांना मुंबईत राहणे अशक्य झालं होतं. त्यामुळे त्यांनी मिळेत त्या मार्गाने, वाहनाने किंवा पायी आपली घरची वाट धरली. मात्र, हे करत असताना मजुरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. या दरम्यान अभिनेता सोनू सूदने या मजुरांना मदतीचा हात दिला आणि शेकडो मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याची त्याने सोय केली. मात्र, मजुरांसाठी हिरो ठरलेल्या सोनूवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
सोनू सूदच्या पाठीमागे राजकीय घटक : राऊत
सोनू सूदचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रातले काही राजकीय घटक ‘ठाकरे सरकार’ला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत होते, अशी टीका संजय राऊत यांनी सामनातील 'रोखठोक'मधून केली आहे. संजय राऊत यांनी सामना या वृत्तपत्रातील लेखातून सोनू सूदच्या कामगिरीला अप्रत्यक्षपणे भाजपाचा पाठींबा असल्याचा संशय व्यक्त केला होता. सोनू सूदला पुढे करत ठाकरे सरकार अपयशी ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय असं राऊत यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे.
सोनू सूद उत्तम अभिनेता, त्याचे पडद्यामागचे राजकीय दिग्दर्शक तितकेच कसलेले; संजय राऊतांची टीका
सोनूचे ट्विटरवरुन उत्तर
सोनूने संजय राऊत यांच्याकडून झालेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर आपल्या ट्विटर हँडलवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये तो म्हणतो की, “स्थलांतरीत मजूर आणि माझं नातं खूप वर्षांपासूनचं आहे. स्थलांतरीत मजूरांसाठी केलेलं कार्य फक्त एका राज्यापुरतं मर्यादित नाही. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत ज्याने मला मदतीसाठी बोलावले त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला. प्रत्येक राज्याच्या सरकारने माझ्या या कामात सहकार्य केलं.”
संजय राऊत यांनी काय म्हटले आहे?
संजय राऊत यांनी सोनूवर निशाणा साधताना म्हटलं की, “महाराष्ट्राला सामाजिक चळवळीची मोठी परंपरा आहे. यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून ते बाबा आमटेंपर्यंत अनेकांची नावं आहेत, आता यामध्ये सोनू सूदचं नाव घेतलं जाईल. मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत करताना सोनूची छायाचित्र, व्हिडीओ प्रसिद्ध झाले. सरकार मजुरांना पोहचवण्यात अपयशी ठरलं, पण सोनूसारखे महात्मा हे काम किती सहजतेने करत आहेत असा प्रचार समाजमाध्यमांमध्ये सुरु झाला. भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतले. त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला. खऱ्या कलाकाराला पडदाच लागतो असे नाही, हे ‘महात्मा’ सूद याने दाखवून दिले. ‘लॉक डाऊन’ काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक निर्माण झाला. इतक्या झपाट्याने आणि शिताफीने कोणाला महात्मा बनवले जाऊ शकते? सूद याने म्हणे लाखो मजुरांना त्यांच्या घरी परराज्यांत पोहोचवले. म्हणजे केंद्र व राज्य सरकारांनी काहीच केले नाही. या कार्याबद्दल महाराष्ट्राच्या राज्यपालांनी महात्मा सूद यास शाब्बासकी दिली.”
Sonu Sood Special Report | सोनू सूदच्या मदतकार्यावरून भाजप-शिवसेनेत 'सामना'