मुंबई : शिवसेनेने सत्तेची गणितं जुळवण्यास सुरुवात केली आहे. सत्तेसाठी शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या बंडखोरांनाच शिवसेना जवळ करण्याच्या तयारीत असल्याचं चित्र आहे. कारण घाटकोपरमधून निवडून आलेल्या अपक्ष नगरसेविका स्नेहल मोर शिवसेनेला पाठिंबा देणार आहेत.


घाटकोपरमध्ये शिवसेना उमेदवारांच्या विरोधात माजी शिवसेना विभागप्रमुख सुधीर मोरे यांनी बंडखोरी केली होती. त्यांच्या वहिनी अपक्ष स्नेहल मोरे या एक हजार मतांनी निवडून आल्या.

शिवसेनेत आज सुधीर मोरेंसह स्नेहल मोरेही प्रवेश करणार आहेत. दुपारी 12.30 वाजता त्यांचा पक्षप्रेवश होईल. विशेष म्हणजे सुधीर मोरेंची बंडखोरी केल्यानं पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.

मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यापासून शिवसेना आणि भाजप दोन्हीही पक्ष 114 या मॅजिक फिगरपासून दूर आहेत. भाजपला 82, तर शिवसेनेला 84 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे दोन्हीही पक्षांनी सत्तेची गणितं जुळवण्यास सुरुवात केली आहे.

संबंधित बातमी : मुंबईत कुणाचा महापौर बसणार? सत्तेची समीकरणं