उल्हासनगर  : उल्हासनगर: नेहरू चौकातील बँक ऑफ बडोदा समोर साई सिद्धी या पाच मजली इमारतीचा स्लॅब (Ulhasnagar Building Collapse)कोसळल्याची घटना घडली आहे. या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.  या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. आणखी दोन जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 


या घटनेत आतापर्यंत कृष्णा बजाज, दिनेश चांदवानी, मोहिनी चांदवानी ,दीपक चांदवानी ,पुनीत चांदवानी ,नम्रता बजाज या सहा जणांना मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. 


रात्री दहा वाजण्याच्या सुमारास या इमारतीवरील चौथा मजल्याचा स्लॅब पत्त्या सारखा कोसळून थेट तळमजल्यावर आला. या इमारतीमध्ये एकूण 29 फ्लॅट होते.  दरम्यान घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं आहे. आत्तापर्यंत सहा ते आठ जणांना बाहेर काढण्यात अग्निशमन विभागाला यश आले आहे. मात्र अद्यापही काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


घटनेची माहिती मिळताच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या रहिवाशांना वाचवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेची टीडीआरएफ टीम घटनास्थळी झाली आहे. सध्या बचावकार्य वेगाने सुरू आहे.


उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी सांगितलं की, मागील घटना घडल्यानंतर आपण क्षेत्रातील सर्व इमारतीना आपण नोटिशी बजावल्या आहेत. मागील दहा दिवसात 900 इमारतींना नोटिसा दिल्या होत्या. त्या यादीत ही इमारत आहे की नाही? याची माहिती आपण घेत आहोत, असं ते म्हणाले. 


आठवडाभरापूर्वीच उल्हासनगर मधील मोहिनी पॅलेस इमारतीमध्ये देखील अशाच प्रकारची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला होता. सतत घडणाऱ्या या घटनांमुळे उल्हासनगरमधील धोकादायक व अतिधोकादायक इमारतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.