ठाणे : ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आज संध्याकाळच्या सुमारास अचानक स्लॅबचा काही भाग कोसळला. सिव्हिल हॉस्पिटलच्या मॅटर्निटी वॉर्डमध्ये ही घटना घडली. दोन नवजात बालकांसह एक महिला जखमी झाल्याची माहिती मिळते आहे.

प्रसूती झालेल्या महिला पलंगावर आपल्या बाळांना घेऊन झोपलेल्या असताना त्यांच्या अंगावरच या स्लॅबचे तुकडे पडले. या घटनेमध्ये दोन नवजात बाळं जखमी झाली असून एका महिलेलाही दुखापत झाली आहे. पूजा महेश गौतम (२२), आलीना शेख (१ महिना) आणि एक पाच दिवसांचं नवजात बाळ असे तिघे यात जखमी झालेत.

या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन टीमने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर घाबरलेल्या महिला आपल्या बाळांना घेऊन हॉस्पिटलच्या बाहेर बसल्या होत्या.

दरम्यान, जिथे हा प्रकार घडला, तो मॅटर्निटी वॉर्ड हा जिल्हा शल्यचिकित्सकांच्या केबिनला लागूनच आहे. तरीही तिथे रुग्णालय प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्यानं संताप व्यक्त होतोय. अशा प्रकारच्या स्लॅब कोसळण्याच्या घटना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आजवर अनेकदा घडल्या आहेत. मात्र अजूनही या घटना रुग्णालय प्रशासनाने गांभीर्याने घेतलेल्या नाहीत. आता एखाद्याच्या जीवावर बेतल्यावर रुग्णालय प्रशासन जागं होणार का? असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाला आहे.