मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा आपल्या कुंचल्यातून सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत. यावेळी राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणावर व्यंगचित्र रेखाटले असून, त्याच व्यंगचित्राच्या एका कोपऱ्यात मोदींच्या फिटनेस चॅलेंजचीही खिल्ली उडवली आहे.

फेसबुक आणि ट्विटरवरुन राज ठाकरेंनी हे व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे.

जातीपातीच्या राजकारणावर राज ठाकरेंचा घाव

शरद पवारांनी पुण्यात पुणेरी पगडीऐवजी फुले पगडी घालण्याचे आवाहन केल्यानंतर, अनेकांनी या घटनेला जातीपातीच्या राजकारणाची उपमा देत टीका केली. तसेच, जामनेरमधील मारहाणीमुळेही जातीय द्वेषाची घटना उघडकीस आली होती. या घटनांचा धागा पकडत राज ठाकरेंनी व्यंगचित्र रेखाटल्याचे दिसते आहे.



राज ठाकरेंनी रेखाटलेल्या व्यंगचित्रात एक विस्तीर्ण झाड दिसत असून, त्या झाडाला 'महाराष्ट्र' असे नाव दिले आहे. या झाडाला वेलींनी घेरले आहे. या वेलींवर 'जातीपातीचे विष' असे लिहिले आहे. झाडाच्या बाजूला मुख्यमंत्री फडणवीस उभे असून, तिथे बाजूलाच असलेला 'मराठी' माणूस मुख्यमंत्र्यांना झाडाच्या विषारी वेली छाटण्याची विनंती करतो आहे.

याच व्यंगचित्राच्या एका कोपऱ्यात राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फिटनेस चॅलेंजचीही खिल्ली उडवली आहे.

पंतप्रधान मोदी एका दगडावर झोपले आहेत, बाजूला एकजण रडताना दिसतो. त्याची पत्नी त्याला म्हणते, "उठाsss!!! असे रडत काय बसलात लहान पोरासारखे! अहो, ते व्यायाम करतायत!"

एकंदरीत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर आपल्या कुंचल्यातून निशाणा साधला आहे.