ठाणेः दहीहंडी आणि न्यायालयाच्या आदेशांची सध्या सर्वत्र चर्चा आहे. पण या सगळ्यात ठाण्यात एक अनोखी हंडी पार पडली. रस्त्यावर खाण्यापिण्याविना फिरणारी मुलं जेव्हा शाळेत जातात, पुस्तकांशी गट्टी करतात, तो अनुभव वेगळाच असतो.


 

ठाण्याच्या तीन हात नाक्यावर सिग्नलवर फिरणाऱ्या मुलांसाठी खास 'सिग्नल शाळा' भरवण्यात आली आहे. आयुष्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची शाळा, गाणी, गोष्टी असं बरंच काही ही मुलं अनुभवत आहेत. तीन महिन्यांपासून समर्थ भारत व्यासपीठ आणि ठाणे महापालिकेने हा उपक्रम सुरू केला आहे.

 



रस्त्यावर फिरणारे मुलं जेव्हा पुस्तकात रमतात..

 

शाळेच्या गंमती-जमती पहिल्यांदाच अनुभवायला मिळाल्यामुळे या सिग्नल शाळेतील मुलांचा आनंद गगनाला भिडला आहे. शिवाय कायम सिग्नलला छोट्या-छोट्या वस्तू विकून आपल्या आई-वडिलांना पोट भरायला मदत करणारी ही मुलं पुस्तकांशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत आहेत.

 



 

आपल्या मुलांनी पुस्तकांशी केलेली गट्टी पाहून पालकांचेही डोळे पाणावले. मुलं शिकत असल्याने रस्त्यावरचं आयुष्य काढत असलेले त्यांचे आई-वडीलही समाधानी आहेत. ज्यांना झोपायला घर नाही आणि दैनंदिन पोटाची खळगी भरण्याची चिंता आहे, अशांसाठी ही सिग्नल शाळा नव्या उमेदीचा किरण आहे.