अल्पवयीन मुलाची पोलिसालाच बेदम मारहाण
एबीपी माझा वेब टीम | 24 Aug 2016 10:14 AM (IST)
मुंबई: मुंबईतील खारमध्ये एका वाहतूक पोलिसाला बांबूने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी संध्याकाळी ४च्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये जखमी झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव विलास शिंदे असं आहे. एका अल्पवयीन मुलाला पेट्रोल पंपावर हेल्मेट नसतानाही पेट्रोल भरतांना त्यांनी पकडलं. त्याच्याकडे परवाना देखील नव्हता. याबाबत चौकशी सुरू असतानाच अल्पवयीन मुलाने आपल्या भावाला बोलावून घेतले आणि चक्क पोलिसावरच हल्ला केला. पोलिसांवर हल्ला करुन दोघेही हल्लेखोर पळून गेले. दोन हल्लेखोरांपैकी एकाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. तर दुसऱ्या हल्लेखोराचा शोध सुरु आहे. दरम्यान जखमी पोलीस कॉन्सेटबल विलास शिंदेंना लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.