मुंबई : भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या समर्थनार्थ आज मुंबई उच्च न्यायालयाबाहेर सह्यांची मोहीम राबवण्यात आली. न्यायाधीश लोया प्रकरणी याचिका दाखल करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. यासंदर्भात 51 वकिसांच्या शिष्टमंडळाने प्रभारी मुख्य न्यायामूर्तींना निवदेन सादर केलं.


न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूप्रकरणी याचिका दाखल करुन राजकीय पक्ष आणि त्यांच्याशी प्रेरित असलेले लोक आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अशांवर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे, या मागणीसह मुंबई उच्च न्यायालयातील काही वकिलांनी हायकोर्टाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विजया कापसे-तहिलरमानी यांना मंगळवारी एक पत्र लिहिलं आहे. तसंच या पत्राचं सुमोटो याचिकेत रुपांतर करावं, अशी मागणीही या पत्रातून करण्यात आली आहे.

प्रशांत मग्गू यांच्या पुढाकाराने पाठवलेल्या या पत्रात हायकोर्टासह इतर कोर्टातील एकूण 51 वकिलांनी सह्या केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य गेटवर सह्यांची मोहीम राबवण्यात येत आहे. याबाबत जनजागृतीचा एक भाग म्हणून एका मोठ्या साईनबोर्डवर हायकोर्टाबाहेर सर्वांच्या सह्या घेण्यात येत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्यापर्यंत राजकीय पक्षांची मजल गेल्याने याची गंभीर दखल घेण्याची गरज असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. देशाची प्रतिमा मलिन करण्यात काही वकील संघटनाही यात सामील होत असताना, उघड्या डोळ्यांनी पाहणं शक्य नसल्याची बाब या पत्रात प्रामुख्याने नमूद केली आहे.
जस्टिस लोया यांच्या मृत्यूप्रकरणी हायकोर्टाशी संबंधित न्यायमूर्ती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असल्याबद्दल तीव्र नाराजीही या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.