मुंबई : मुंबई महापालिकेने 'खड्डे दाखवा, 500 रुपये मिळवा,' ही योजना सुरु केली खरी, पण या योजनेतील पैसे नेमके कोणाच्या खिशातून देणार, त्यासाठी पैसे कुठून आणणार याबाबत प्रशासनाने स्पष्टीकरण दिलं आहे. या योजनेतले पैसे अधिकाऱ्यांच्या खिशातून जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने स्थायी समितीत दिली. रस्त्यांची देखभाल, दुरुस्ती न करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांना जरब बसावी म्हणून ही योजना आणल्याचं प्रशासने सांगितलं.


1 नोव्हेंबरपासून खड्डे दाखवा 500 रुपये मिळवा योजनेची अंमलबजावणी सुरु होईल, अशी सूचना महापालिका आयुक्तांकडून देण्यात आली होती. मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी आयुक्त प्रविण परदेशींनी ही नवी योजना आणली आहे. अर्थातच यासाठी काही अटी  आणि शर्ती देखील घालण्यात आल्या आहेत. मात्र, खड्डे दाखवल्यानंतर महापालिका नेमके कोणाच्या खिशातून पैसे देणार, त्यासाठी पैसे आणणार कुठून याबाबत स्पष्टता नव्हती. याबाबत महापालिका प्रशासनाने स्थायी समितीत स्पष्टीकरण दिलं.

मुंबईत 'खड्डे दाखवा 500 रुपये मिळवा', महापालिकेचं मुंबईकरांना चॅलेंज 

खड्डे दाखवा 500 रुपये मिळवा, योजनेवरुन स्थायी समितीत खडाजंगी झाली. सर्वपक्षीय नगरसेवक प्रशासनावर भडकले. स्थायी समितीतला कोणतीही माहिती न देता प्रशासन अशी हास्यास्पद योजना लागू करतेच कसं? असा सवाल विचारण्यात आला. त्यावर रस्त्यांची देखभाल, दुरुस्ती न करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांना जरब बसावी यासाठी ही योजना आणल्याचं प्रशासनाने सांगितलं.

योजनेबाबत महापालिकेच्या अटी-शर्ती?
- मुंबईकरांनी दाखवलेला कमीतकमी  खड्डा 1 फूट लांब आणि 3 इंच खोल पाहिजे
- तक्रारीनंतर 24 तासांत खड्डा भरला गेला तर पैसे मिळणार नाहीत.
- खड्डे दाखवा, पैसे मिळवा या योजनेसाठी My BMC pothole fixlt या अॅप वर जाऊन खड्ड्यांची तक्रार नोंदवावी लागेल.