उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेनं काही दिवसांपूर्वीच जाहीर केलेल्या शहर विकास आराखड्याविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. नव्या विकास आराखड्यात अस्थापन बाधितांच्या पुनर्वसनाची कोणतीही तजवीज नसल्याचा आरोप करत, शिवेसनेने आज मोर्चा काढला.

महापालिकेच्या नवीन विकास आराखड्यानुसार शहरात नवीन प्रकल्प, रस्ते, रिंगरोड बांधण्यात येणार आहे. यात सुमारे दोन लाख घरं आणि आस्थापना बाधित होणार आहेत. पण, त्यांच्या पुनर्वसनाची कोणतीही तजवीज नाही. त्यामुळं हा आराखडा नागरिकांना देशोधडीला लावणार असल्याची टीका शिवसेनेकडून होत आहे.

याबाबत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यानंतर आज उल्हासनगर महापालिकेत विरोधी पक्षात असलेल्या, शिवसेनेनं उल्हासनगर महापालिकेवर मोर्चा काढला होता. यावेळी हा विकास आराखडा रद्द करण्याची मागणी केली.

या मोर्चाचं नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी केले.