मुंबई : तुम्ही शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या गायकीचे चाहते असाल तर कदाचित ही बातमी ऐकून तुम्हाला धक्का बसेल. कारण, आपल्या सूरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणारे राहुल देशपांडे यांनी पुढील वर्षीपासून संगीत नाटक न करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरमध्ये वसंतराव देशपांडे संगीत सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी सर्वांसमोर हे जाहीरपणे सांगितलं. संगीत नाटक बंद करण्याचा निर्णय का घेतला हे देखील राहुल देशपांडे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. ''तुम्हाला एखादी गोष्ट जोपर्यंत आतून करावीशी वाटत असते, तोपर्यंतच ती करायला हवी. आता मला आतून वाटत नाही, की संगीत नाटक करावं, म्हणून मी संगीत नाटकं बंद करण्याचा निर्णय घेतला,'' असं राहुल देशपांडे म्हणाले. ''कुठे थांबावं हे आपल्याला कळायला हवं. लोकांनी थांब म्हणायच्या आतच थांबलेलं चांगलं असतं,'' असं मिश्कील उत्तरही राहुल देशपांडे यांनी दिलं.