हजारो धर्मा पाटील सरकार बेचिराख करतील : सामना
एबीपी माझा वेब टीम | 12 Mar 2018 09:13 AM (IST)
शेतकऱ्यांचा आक्रोश आणि वेदना सरकारला बेचिराख केल्याशिवाय राहणार नाही, अशी कडवी टीका सामनातून केलीय.
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून सत्ता भोगणाऱ्या शिवसेनेनं आज पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला. सरकारने अर्थसंकल्पात फसव्या घोषणा करुन कष्टकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. धुळ्याचे धर्माबाबा पाटील या शेतकऱ्याने मुंबईत मंत्रालयात आत्महत्या केली. आता जय किसानचा नारा देत हजारो जिवंत धर्मा पाटील मंत्रालयाच्या दिशेनं निघाले आहेत. आता त्यांचा आक्रोश आणि वेदना सरकारला बेचिराख केल्याशिवाय राहणार नाही, अशी कडवी टीका सामनातून केलीय. ‘सामना’मध्ये काय म्हटलं आहे? अर्थसंकल्पात शेतकऱयांच्या नावाने फक्त घोषणांची बोंब मारण्यात आली. ना कर्जमाफी ना नुकसान भरपाई. शेतकरी मोठ्य़ा संख्येने आत्महत्येच्या मार्गावरून निघाला आहे व त्याने क्रांतीची ठिणगीच टाकली आहे. शेतकऱ्यांनी आधी संप पुकारला. आता सरकारचा निषेध करण्यासाठी हाच शेतकरी मुंबईत धडकला आहे. मोर्चेकऱ्यांना भुलवण्यासाठी एखाद्या मंत्र्यास पाठवले जाईल व आश्वासनांच्या भूलथापा देऊन तो मोर्चाचा जोश तात्पुरता थंड करील, पण मोर्चेकऱ्यांची जिद्द अशी दिसत आहे की, त्या कोणत्याही भूलथापांना शेतकरी बळी पडणार नाहीत. शेतकऱ्यांचा मोर्चा नाशिकहून निघाला. हा मोर्चा कोणत्या विचारांचा, कोणत्या संघटनेचा, कोणत्या रंगाचा या चर्चेत पडायचे कारण नाही. तो शेतकरी आहे, कष्टकरी आहे. त्याला जात नाही, धर्म नाही व राजकीय विचार नाही. महाराष्ट्राच्या राजधानीत त्याचे स्वागत आम्ही करीत आहोत.