मुंबई : राज्यातील भाजप सरकार हे शिवसेनेच्या पाठिंब्यावर आहे, हे भाजपनं विसरु नये. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जी भाषा वापरली जातेय. ती वैयक्तीक मतं असू शकत नाही. अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला सुनावलं आहे.
भाजपमधील काही फडतूस लोक सरकारचे मालक असल्यासारखे बोलत आहेत. त्यावरुन त्यांना हे सरकार बुडवायचं आहे हे स्पष्ट होतंय. भाजपची शिवसेनेसोबत राहण्याची इच्छा नसेल तर छगन भुजबळ, अजित पवार, सुनील तटकरेंच्या पाठिंब्यावर सरकार चालावा असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला आहे.
काल माधव भंडारी यांनी मनोगत या भाजपच्या पाक्षिकातून उद्धव ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरेंची तुलना शोलेमधील असरानीबरोबर केली. त्यानंतर शिवसेनाही आक्रमक झाली आहे.
काय म्हणाले संजय राऊत ?
भाजपमधील काही फडतूस लोक सरकारचे मालक असल्यासारखे सध्या बोलत आहेत. ही त्यांच्या अकलेची दिवाळखोरी आहे. हे सरकार त्यांना बुडवायचे आहे आणि त्यासाठीच त्यांना ही अवदसा आठवली आहे.
राज्यातील भाजप सरकार हे शिवसेनेच्या पाठिंब्यावर आहे, हे त्यांनी विसरु नये. जर त्यांची इच्छा नसेल तर छगन भुजबळ, अजित पवार, सुनील तटकरे यांच्या पाठिंब्यावर त्यांनी हे सरकार खुशाल चालवावे.
अशाप्रकारचा गोंधळ आणि अराजक निजामाच्या काळातच होता. भाजपातील फडतूस लोक ती स्थिती निर्माण करणार असतील तर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांना चाप लावावा. शिवसेना आणि शिवसैनिक हा प्रकार सहन करु शकणार नाहीत.
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जी भाषा वापरली जात आहे, ती वैयक्तिक मते असू शकत नाहीत.
अशा प्रकारची मतं मांडून जर कोणी शिवसेना आणि शिवसेना कार्यध्यक्षांची बदनामी करत असेल, तर त्यांचा बंदोबस्त करायला शिवसैनिक समर्थ आहेत. हे कोणाचे वैयक्तिक मत नसून ही शिवसेनेची भूमिका आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
सेना खासदार खैरेंचं टीकास्त्र
भाजप प्रवक्ते माधव भंडारींची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबाबत बोलायची औकात नाही. त्यांनी यापुढे उध्दव ठाकरेंविरोधात बोलू नये. शिवसैनिक हा माथेफिरु असतो आणि तो काहीही करु शकतो. अशा शब्दात शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी माधव भंडारींना आणि भाजपला धमकी वजा इशारा दिला आहे.
किशोरी पेडणेकरांचा घणाघात
मुंबईतील शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनीही भाजपवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंना जर असरानी म्हणत असाल, तर भाजप अध्यक्ष अमित शाह हे गब्बर सिंह आहेत. ज्या पद्धतीने अमित शाह कारभार करतायत ते पाहता ‘शोले’मध्ये शेवटी जी हालत गब्बरची झाली, तीच हालत भाजपच्या या गब्बर सिंघची व्हायला वेळ लागणार नाही, असा हल्लाबोल शिवसेनेच्या मुंबईच्या मनपातील नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
माधव भंडारी 'मनोगत'मध्ये काय म्हणाले?
मनोगत या भाजपच्या पाक्षिकातून उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊतांवर टीकेची झोड उठवली. ‘राऊत साहेब तलाक केव्हा घेताय’, असं शिर्षक देऊन भाजप सरकारचा निजामांचा बाप असा उल्लेख करणाऱ्या राऊतांवर भाजपचे प्रवक्ते माधव भंडारींनी टीका केली.
तसंच या पाक्षिकात उद्धव ठाकरेंची तुलना ‘शोले’ सिनेमातल्या जेलरच्या भूमिका साकारणाऱ्या ‘असरानी’ यांच्याशी करून खिल्ली उडवली आहे.
संबंधित बातम्या
'भंडारी औकातीत राहा, आम्ही कधी सोमय्यांना शक्ती कपूर म्हटलंय का?'
अमित शाह गब्बर, माधव भंडारी राजपाल यादव, सेनेचा हल्लाबोल
'सत्य हे शेवटी सत्यच असते', सामनातून सेनेचा भाजपवर निशाणा
'राऊत साहेब, तलाक केव्हा घेताय?' भाजपाच्या पाक्षिकातून सेनेवर शरसंधान