मुंबई : मंत्रालयासह विविध सरकारी कार्यालयात लावलेले धार्मिक फोटो सन्मानाने बाहेर काढण्याचं परिपत्रक राज्य सरकारने काढलं आहे. या परिपत्रकामुळे शिवसेना मंत्र्यांमध्ये सरकारच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी पसरली आहे.
2002 मध्ये आघाडी सरकारने पहिल्यांदा यासंदर्भात परिपत्रक काढलं होतं. पण हा आदेश राबवण्याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने आग्रही भूमिका घेतली नव्हती. जे आघाडी सरकारला जमलं नाही, ते हिंदुत्ववादी सरकारने करुन दाखवल्याने शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी आहे.
राज्यातील शासकीय-निमशासकीय कार्यालयं, शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठे ही सर्वच ठिकाणे सर्व प्रकारच्या धार्मिक उत्सव आणि देवदेवतांच्या फोटोंपासून मुक्त करण्याच्या सूचना राज्य शासनानं दिल्या आहेत.
नुकतंच सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यासाठी आम्ही काम करतो, असे म्हटलं होतं. मात्र महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी सरकारनेच मंत्रालयातील धार्मिक फोटोंना हद्दपार करत जनतेच्या भावनेला हात घातल्याचा आरोप होत आहे.
शिवसेना निवडणुकांमध्ये हिंदुत्ववादाचा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे प्रजासत्ताक दिनी करणाऱ्या भाषणात या मुद्द्यावरुन भाजप सरकारवर टीका करण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजप राम मंदिराचा मुद्दा काढणार असल्यामुळे त्याला शिवसेना प्रत्युत्तर देण्याचे संकेत आहेत.