मुंबई : मेहबुबा मुफ्तींसोबत जाण्यापेक्षा काँग्रेस परवडली, असं म्हणत शिवसेनेने मुंबई महापालिकेत सत्तास्थापनेसाठी काँग्रेस अस्पृश्य नसल्याचे संकेत दिले आहेत. शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'तून भाजपवर पुन्हा एकदा टीकेचे बाण सोडण्यात आले.

मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरुच आहे. कुठल्याही स्थितीत काँग्रेससोबत जाणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्यावर शिवसेनेने 'सामना'मधून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काय लिहिलं आहे 'सामना'?

मुख्यमंत्र्यांनी काँग्रेससोबत जाणार नाही हे सांगून चांगले केले, पण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक ओवाळून टाकलेल्या लोकांची भरती करून स्वपक्षाची ‘काँग्रेस’ केली आहे त्याचे काय? त्यामुळे काँग्रेस परवडली, पण भाजपची सध्या झालेली काँग्रेस महाराष्ट्राला आणि देशाला कुठे घेऊन जाणार हा प्रश्नच आहे.

मुख्यमंत्र्यांनी असे बोलायला हवे होते की, ‘‘आम्ही म्हणजेच भाजप काँग्रेससोबत जाणार नाही, पण पाकिस्तानवादी मेहबुबा मुफ्तीसोबत जाणार!’’ काँग्रेस नक्कीच संशयास्पद आहे, पण अफझल गुरूसारख्या अतिरेक्यांचे खुले समर्थन करणाऱया मेहबुबा मुफ्तीबरोबर ‘सत्ता’ उबवणे हे जास्त घातक आहे. अर्थात हा ‘घातकी’ प्रकार राष्ट्रासाठी केल्याची टिमकी वाजवायला हे मोकळेच आहेत! अफझल गुरूस काँग्रेस राजवटीत फासावर लटकवले व मेहबुबा मुफ्ती या भाजपबरोबर सत्तेत असताना अफझल गुरूस ‘हुतात्मा’ वगैरे मानतात हे शिवरायांसमोर मस्तक टेकणाऱयांना चालते काय? अफझल गुरूस शहीद किंवा क्रांतिकारक मानणे म्हणजे अफझलखानास शिवशाहीचे प्रेरणास्थान मानण्यासारखेच आहे.