मुंबई : मनी लॉंड्रिंग प्रकरणात ईडीच्या कोठडीत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील (Mumbai Sessions Court) विशेष पीएमएलए कोर्टात त्यांनी हा अर्ज दाखल केला असून यावर उद्या म्हणजे गुरुवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. ईडीनं खासदार संजय राऊत यांना गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patra Chawl Land Scam Case) मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली आहे.
खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सध्या आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना मुंबई सत्र न्यायालयाने 19 सप्टेंबर पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. पत्राचाळ प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी ईडीनं अटक केली होती. या प्रकरणी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. संजय राऊतांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे. आर्थर रोड कारागृहात संजय राऊत यांना घरचं जेवण आणि औषधं पुरवण्याची मुभा न्यायालयानं दिलं होती.
काय आहेत ईडीचे आरोप?
पत्राचाळ घोटाळ्यात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा हात असल्याचा आरोप ईडीने केला आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांचे बंधू प्रविण राऊत हे पत्राचाळ विकासाचं काम पाहत होते. त्यांना HDIL मिळालेल्या 112 कोटी रुपयांपैकी 1.06 कोटी रुपये हे संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर पाठवण्यात आल्याचा आरोप ईडीने केला आहे. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. संजय राऊत हेच खरे या घोटाळ्याचे आरोपी असल्याचा आरोप ईडीने केला आहे.
पत्रचाळ घोटाळा प्रकरण काय आहे?
मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. या ठिकाणच्या चाळीच्या विकासाचं काम प्रविण राऊत यांना देण्यात आलं होतं. मात्र या ठिकाणच्या जमीनीचा काही भाग त्यांनी बिल्डरांच्या घशात घालण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 25 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.