मुंबई: दोन वर्षांपूर्वी राज्यात भाजपचे सरकार होते. त्यावेळच्या वनमंत्र्यांच्या घरच्या लग्नात अवाढव्य खर्च करण्यात आला. त्या लग्नात कार्पेट हे साडे कोटी रुपयांचे होतं. हे ईडीला दिसलं नाही, पण मी कपडे शिवले तिथे देखील ईडीच्या लोकांनी तपास केला. असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.


खासदार संजय राऊत म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी भाजपच्या सरकारातील वनमंत्र्यांच्या घरी लग्न होतं. ते वनमंत्री होते म्हणून लग्नाची थीम ही जंगलाची होती. त्यावेळी तिथलं कार्पेट हे साडे नऊ कोटींचे होतं. या लग्नात अवाढव्य खर्च केला होता. हे ईडीला कधी दिसलं नाही. पण आम्ही म्हटलं लग्न आहे...कशाला उगाचा काढा. पण मी ज्या ठिकाणी कपडे शिवले तिथेही ईडीच्या लोकांनी तपास केला. 


खासदार संजय राऊत भाजप नेते किरीट सोमय्याविषयी बोलताना म्हणाले की, "छत्रपतींच्या या राज्यामध्ये या आधी असं घाणेरडे राजकारण केलं नाही. उद्धव ठाकरे आणि परिवाराच्या रोज काही ना काही बातम्या उठवायच्या. पण या बातम्या जो सांगतो ना तो दलाल आहे. किरीट सोमय्या हा माणूस मराठी द्वेष्टा आहे. त्यानेच मुंबईतील शाळांमध्ये मराठी सक्ती केल्यानंतर कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. आधी त्याचं थोबाड बंद करा. मराठीचा द्वेष करणाऱ्या या माणसाकडून अजून काय अपेक्षा करणार?


शरद पवार हे महाविकास आघाडीचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. म्हणून हे सरकार पाडण्यासाठी भाजपने पवार कुटुंबियांच्या मागेही ईडीचा ससेमिरा लावला. मन साफ आहे तर कुणाच्या बापाला घाबरु नका असा सल्ला बाळासाहेबांनी दिला होता असं खासदार संजय राऊत म्हणाले


केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी भाजपाचा प्रयत्न आहे. पण महाराष्ट्र हा गां*ची औलाद नाही, महाराष्ट्र बेईमान नाही असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 


खासदार संजय राऊत म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्राणांचा वापर करून महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही काही लोकांनी आम्हाला मदत केली नाही तर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा तुमच्या मागे लावू.  आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली लढलो, नुसते हल्लेच नाहीत तर अतिरेक्यांचे हल्ले आम्ही परतवले आहेत ते याच वास्तूच्या खाली. 


गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय तणाव वाढत आहे. त्याचवेळी संजय राऊत हे शिवसेनेत एकटे पडतायत का असाही सवाल विचारला जात होता. त्यावर आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेला शिवसेनेचे महाराष्ट्रातील बडे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha