युतीसाठी मनसेने दिलेली टाळी उद्धव ठाकरेंनी झिडकारली
एबीपी माझा वेब टीम | 30 Jan 2017 04:22 PM (IST)
मुंबई : शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष निवडणुकांच्या तोंडावर युती करण्याच्या शक्यता मावळल्या आहेत. युतीसाठी अद्याप कोणाचाही प्रस्ताव आलेला नसून आपण कोणाशीही युती करणार नसल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. युतीसाठी कुठल्याही पक्षाकडून प्रस्ताव आलेला नाही, मात्र कोणाशीही युती करण्याचा विचार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसेना-मनसे युतीच्या शक्यता फेटाळून लावल्या आहेत. दहा महापालिका आणि सर्व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी केला. आम्ही पूर्ण सामर्थ्याने मैदानात उतरत आहोत, असं सांगत संपूर्ण महाराष्ट्र भगवा करण्याचा मानसही त्यांनी यावेळी बोलून दाखवला. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेत्यांची भेट घेतली होती. उद्धव ठाकरे यांच्याशी मात्र नांदगावकरांची भेट होऊ शकली नाही. तरीही शिवसेना-मनसे युती होण्याची आशा समर्थकांमध्ये निर्माण झाली होती. नांदगावकर यांनी मनसेचा संदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला. राज ठाकरे युती करण्यासाठी अनुकूल असून, तुमची इच्छा असल्यास राज ठाकरे आपली भेट घेतील, असा निरोप दिला. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर सेना-मनसे एकत्र येण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. शिवसेनेची उमेदवार यादी अंतिम टप्प्यात आहे, त्यावर बैठकांमध्ये चर्चा सुरु आहे. त्यामुळे पुन्हा युतीच्या प्रस्तावावर नव्याने बोलणी करण्याची शिवसेनेची तयारी नसल्याचं बोललं जात आहे.