मुंबई : शिवसेना सुभाष देसाई यांच्या पाठीशी आहे, असं सांगत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देसाईंची पाठराखण केली. विरोधकांच्या मागणीनंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी राजीनाम्याच्या तयारी दाखवली. त्यावर उद्धव ठाकरेंनी पक्षाचा देसाईंना पाठिंबा असल्याचं सांगितलं.


एआयडीसीतील अधिसूचित जमिनीपैकी 60 टक्के भूखंड वगळल्याचा आरोप करत विरोधकांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यानंतर देसाईंनी राज्यानाम्याची तयारी दर्शवली आहे. मात्र राजीनामा देण्याची काहीही गरज नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचं देसाई म्हणाले.

विरोधकांची निष्पक्ष चौकशी करा : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले की, "भ्रष्टाचाराने बरबटलेल्या विरोधकांनी ज्या पद्धतीने आरोप केले आणि चिखल उडवला, ही गोष्ट लांच्छनास्पद आहे. आरोप करणारे हे स्वत: भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये गुंतले आहेत. अशा घोटाळेबाज लोक वर तोंड करुन आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात ही गोष्ट लाजिरवाणी आहे."

विरोधकांच्या आरोपांनंतर सुभाष देसाईंची राजीनाम्याची तयारी

"एवढे आरोप झाल्यानंतर काल सुभाष देसाई माझ्याकडे आले. त्यांनी संपूर्ण प्रकरण मला सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी निष्पक्षपातीपणे चौकशी करण्याचं वचन विधानसभेत दिल्याचं देसाईंनी सांगितलं. एक शिवसैनिक म्हणून मी पदाला चिकटून राहणार नाही, मी राजीनामा देऊन मोकळा होतो. मंत्री म्हणून दबाव येऊ नये. कोणाला वाटत असेल तर मी राजीनामा देतो. त्यानुसार आज सकाळी ते मुख्यमंत्र्यांकडे गेले," असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

शिवसेना पक्षप्रमुख म्हणाले की, "पण आरोप कर राजानीमा दे, असा पायंडा पडला तर ते महाराष्ट्राच्या प्रतिमेला साजेसं नसेल. घोटाळे केलेल्या विरोधकांची निष्पक्षपातीपणे चौकशी करुन जर ते गुन्हेगार असतील तर त्यांना त्याची शिक्षा मिळायला पाहिजे, अशी शिवसेनेची विनंती आहे."

सुभाष देसाईंवरील आरोप
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीत मॅग्नेटिक महाराष्ट्रासाठी 600 एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र शिवसेनेच्या जवळच्या बिल्डरला फायदा मिळावा यासाठी यातली 400 एकर जमीन देसाईंनी आरक्षित भूखंडातून वगळल्याचा आरोप विरोधकांनी सुभाष देसाईंवर केला आहे.

त्यामुळे उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधकांनी सभागृहात केली होती. त्यानंतर सुभाष देसाईंनी चौकशी होईपर्यंत राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारला नाही.

पाहा व्हिडीओ