मुंबई : महापालिकेच्या 19 शाळा बंद करण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिका प्रशासनाने मांडला. मात्र या प्रस्तावाला शिवसेनेने तीव्र विरोध करत शाळा सुरुच ठेवण्याचे आदेश दिले.


महापालिका शाळांमधील पटसंख्या घटल्याचे कारण देत, तब्बल 19 मराठी शाळा बंद करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव शिवसेनेने जोरदार विरोध करत हाणून पाडला.

या शाळा बंद करण्याऐवजी चांगल्या सुविधा उपलब्ध करुन पटसंख्या वाढवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करा, असे सक्त आदेश शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर यांनी प्रशासनाला दिले. त्यामुळे मराठी शाळा बंद करण्याचे प्रस्ताव परत पाठवण्यात आले.

येत्या शैक्षणिक वर्षात पालिकेच्या मराठी शाळांबरोबरच उर्दू, गुजराती, तेलगू भाषेच्या शाळांतील विद्यार्थीसंख्या घटल्याने या शाळा बंद करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने  शिक्षण समितीत मांडण्यात आला.  यामध्ये दादर, परळ, वडाळा, परिसरातील आठ शाळांसह मुंबईभरातील शाळांचा समावेश आहे.

या शाळांची पटसंख्या 20 पेक्षा कमी झाल्याने या शाळा बंद करुन पालिकेच्या जवळपासच्या शाळेत त्यांचे विलीनीकरण करण्यात येण्याचा हा प्रस्ताव होता.