मुंबई: भारत माता की जय प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत दाखवलेल्या आक्रमक अवतारावर आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाधून उपरोधिक टोले लगावण्यात आले आहेत.


 

'भारत माता की जय म्हणावचं लागेल असा आक्रमक पवित्रा घेतला. पण, अवघ्या काही दिवसातचं मुख्यमंत्री आपल्या भूमिकेवरुन नरम पडले. अखंड महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या शिवसैनिकांवर नाशकात दरोड्याचे गुन्हे टाकण्यात आले, मग राज्यात येऊन 'भारत माता की जय' म्हणणार नाही असं म्हणणाऱ्या ओवैसीवर कारवाई करुन त्याला तुरुंगात टाकण्याची मुख्यमंत्र्यांनी हिंमत का दाखवली नाही?' असा उपरोधिक सवाल आजच्या सामनामधून विचारण्यात आला आहे.

 

दरम्यान, आता सेनेच्या या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

एक नजर सामनाच्या अग्रलेखावर:

 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पद्धतीने सांगितले की, ‘भारतमाता की जय बोलावेच लागेल. जे भारतमाता की जय बोलणार नाहीत त्यांना हिंदुस्थानात राहाण्याचा अधिकार नाही!’ फडणवीस यांनी हे आधी जोरात सांगितले व नंतर भारतमातेच्या प्रश्‍नी ते नरम पडले. फडणवीस यांनी भारतमातेच्या प्रश्‍नी माघार घेण्याची गरज नव्हती, पण त्यांनी माघार घेतली व त्याचे खापर नेहमीप्रमाणे मीडियावर फोडले. हे असे का झाले याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनीच करायला हवा.

 

‘भारतमाता की जय’ ही घोषणा म्हणजे देशाचा आत्मा आहे व काही लोक हा आत्मा नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हिंदुस्थानात व महाराष्ट्रात सध्या राष्ट्रवादी विचारांचे सरकार असल्याची भावना (की अफवा आहे?) आहे. त्यामुळे याबाबत कोणतीही तडजोड व फालतू राजकारण होऊ नये. दारुल उलूम देवबंदवाल्यांनी ‘मुसलमानांनी भारतमाता की जय बोलू नये,’ असा फतवा काढून राष्ट्रद्रोही बांग दिली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच ठरते, पण ते आधी कठोर झाले व नंतर जास्त पिकलेल्या केळ्याप्रमाणे नरम झाले. सरसंघचालक मोहनराव भागवत यांनीही आधी सगळ्यांना भारतमाता की जय बोलावेच लागेल, भारतमाता की जयचा नारा जगभरात घुमवू असे बजावले; पण लगेच सरसंघचालकही नरम पडले! अशी सक्ती करून कसे चालेल? अशी भूमिका त्यांनी घेतली. या बदललेल्या भूमिका आश्‍चर्यकारक, तितक्याच धक्कादायक आहेत. सक्ती करू नये हे ठीक, पण जे भारतमातेला मानायलाच तयार नाहीत त्यांचे काय करायचे? निदान त्यांच्यावर कारवाई तरी करा. तरच ‘भारतमाता की जय’च्या घोषणांना खरा अर्थ राहील.

 

मुख्यमंत्री सोमवारी विधानसभेत या मुद्द्यावरून पुन्हा आक्रमक वगैरे झाले. ‘भारतमाता की जय’ म्हणणारच असे ‘च’वर जोर देऊन तर त्यांनी सांगितलेच, शिवाय ‘खुर्ची गेली तरी चालेल, पण या मुद्द्यावर माफी मागणार नाही’, असेही सांगून टाकले. मुख्यमंत्री महोदय, हे सर्व ठीकच आहे. ‘भारतमाता की जय’ ही घोषणा देशप्रेमी मंडळी देतच आहेत, पण खरा प्रश्‍न तो नाहीच. ‘भारतमाता की जय’ म्हणायला जे तयार नाहीत, जे उद्दामपणे त्याला नकार देत आहेत त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याच्या वेळी हाच आक्रमकपणा कुठे गायब होतो, हा खरा प्रश्‍न आहे. अखंड महाराष्ट्रासाठी आंदोलन करणार्‍या नाशिकच्या शिवसैनिकांवर दरोड्याचे गुन्हे टाकून तुरुंगात पाठवले जाते आणि आपल्याच महाराष्ट्रात हैदराबादचा ओवेसी येतो व गळा चिरला तरी भारतमाता की जय बोलणार नाही, असे थुंकून निघून जातो. त्या ओवेसीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून येथे फरफटत आणून कसाबच्या कोठडीत ढकलण्याची हिंमत तुम्ही का दाखवली नाही? मुख्यमंत्री म्हणून तुम्ही ही कारवाई केली नसेल तर भारतमाता की जयचे पोकळ नारे देण्याचा अधिकार तुम्हालाही नाही व तुम्हीही ओवेसीइतकेच गुन्हेगार आहात. ज्या त्वेषाने महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणार्‍या फडतूस लोकांचे समर्थन केले जाते त्याच त्वेषात महाराष्ट्रात येऊन भारतमातेवर थुंकणार्‍यांवर कारवाई झाली असती तर तुमचे राष्ट्रप्रेम खरे!

 

ज्यांना महाराष्ट्राचे प्रेम नाही त्यांच्याकडून भारतमातेच्या प्रेमाखातर कठोर कारवाईची अपेक्षा का करावी? जो महाराष्ट्रावर प्रेम करतो तोच भारतमातेसाठी कुर्बान होऊ शकतो, हा इतिहास आहे. भारतमाता की जय हा स्वातंत्र्याचा व अखंडतेचा मंत्र आहे. हा धार्मिक किंवा जातीय नारा नाही. देशातील असंख्य मुसलमानांनी हा नारा स्वातंत्र्यापूर्वी दिला व आजही देत आहेत. भारतमातेच्या प्रश्‍नावर माघार घेण्याची गरज नाही. भारतमाता की जय बोलणार नाहीत त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही, असे तुम्हीच म्हणत आहात ना? मग अशी मस्तवाल भाषा करणार्‍यांना हाकलून द्या. देशात व महाराष्ट्रात आज काँग्रेसची राजवट नाही. तरीही राष्ट्रवादाचे दुश्मन मोकाट कसे? ‘वंदे मातरम्’ राष्ट्रगीत व्हावे व देशाचा राष्ट्रध्वज ‘भगवा’ असावा, असे मत संघाच्या शिलेदारांनी व्यक्त केले.

 

शाब्बास! लोकांच्या मनातील फक्त बोललात. आता हे सर्व कृतीत उतरवण्याचे धाडस दाखवा. दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींना भेटा व हे सर्व ‘राष्ट्रीय’ उपक्रम मार्गी लावा! देशविरोधी फतवा काढणार्‍या देवबंदवाल्यांचे नरडे दाबा. भारतमातेचा अपमान करणार्‍या ओवेसीवर महाराष्ट्रात गुन्हा दाखल करा व जम्मू-कश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबाबाईंना एकदा तरी भारतमाता की जय बोलायला लावा! वाटल्यास हे सर्व करून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अणे वकिलांची नेमणूक करावी! बोला, भारतमाता की जय! जे भारतमाता की जय बोलणार नाहीत त्यांना महाराष्ट्रात व देशात राहाण्याचा अधिकार नाही! अशी गर्जना करून आम्ही काही गुन्हा केला असेल तर मुख्यमंत्री महोदय, आमच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. ओवेसी सुटला तरी चालेल, पण देशप्रेमी तुरुंगात गेलेच पाहिजेत!