कल्याण :  हजारो लोकांनी कष्टाने लावलेल्या झाडांचा साधा सांभाळ देखील वनविभागाला करता येणार नसेल तर 50 कोटी झाडे लावण्याचे लक्ष्य कसे पूर्ण करणार? असा थेट सवालच शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी विचारला. सरकारच्या वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत लावलेली हजारो झाडं आगीत जळून खाक झाली याचपार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे यांनी फेसबुक पोस्ट करत घटनेचा निषेध व्यक्त केला.



अंबरनाथच्या नेवाळी परिसरात सरकारच्या वृक्षलागवड मोहिमे अंतर्गत श्रीकांत शिंदेंनी हजारो झाडं लावली होती. यानंतर काही दिवसांतच या झाडांना आग लावण्यात आल्याची घटना घडली होती. मात्र त्यावेळी आगीची झळ बसलेली अनेक झाडं जगवण्यात वन विभागाला यश आलं होतं.

यानंतर बुधवारी रात्री पुन्हा एकदा याच झाडांना अज्ञातांनी आग लावली. या आगीत दोन टेकड्या संपूर्णपणे जळून खाक झाल्या असून लागवड केलेली 70 टक्के झाडं जळाली आहेत.

या घटनेनंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी संताप व्यक्त केला असून वनविभागाच्या बेजबाबदारपणामुळे हजारो हातांची मेहनत वाया गेल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही शिंदेंनी केली आहे.