मुंबई : मुंबईतल्या दादर भागातील शिवाजी पार्कमध्ये असलेला सेल्फी पॉईंट तरुणांसह सर्वांसाठी आकर्षणाचं केंद्र होता. मात्र आता याच सेल्फी पॉईंटवरुन 'सेल्फी'श राजकारण रंगायला सुरुवात झाली आहे. सेल्फी पॉईंटच्या सुशोभिकरणावरुन शिवसेना, मनसे आणि भाजप या तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे.

दादरमधला सेल्फी पॉईंट मनसेकडून पुन्हा एकदा सुरु करण्यात येत आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार हा सेल्फी पॉईंट पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचा फलक लावण्यात आला आहे. महापालिका निवडणुकांतील पराभवानंतर सेल्फी पॉईन्टच्या देखभालीचा खर्च शक्य नसल्याचं सांगत मनसेनं सेल्फी पॉईन्ट बंद केला होता.



मनसेने हा सेल्फी पॉईंट बंद करण्याची घोषणा केल्यानंतर तो आणखी आकर्षक करणार असल्याचं मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विटरवर सांगितलं होतं. विशेष म्हणजे भाजपला यासाठी महापालिकेकडून परवानगीही मिळाली.

https://twitter.com/ShelarAshish/status/837221190825566208

https://twitter.com/ShelarAshish/status/837277833739239424

दुसरीकडे शिवसेनेनंही सेल्फी पॉईन्टची जबाबदारी स्वीकारत मोठमोठे होर्डिंग्स शिवाजी पार्कात लावले. यापुढे नवीन कलाकृतीसह आपण सेल्फी पॉईंट सुशोभित करत असल्याचं सेना नगरसेविका विशाखा राऊत यांनी फलकाच्या माध्यमातून सांगितलं.



सेल्फी पॉईँटचं कामही आता सुरु करण्यात आलं आहे. या परिसरात सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे आता सेल्फी पॉईंटवरुन मनसे, शिवसेना आणि भाजपमध्ये सामना रंगला आहे.

संबंधित बातम्या :


मुंबईत मनसेनं बंद केलेला सेल्फी पॉईंट भाजप सुरु करणार!


मुंबईमधील शिवाजी पार्कातील ‘सेल्फी पॉईंट’ बंद