मुंबई : शिवसेना आमदारांच्या मतदारसंघातील काम झाली तर ठीक, अन्यथा शिवसेना सत्तेतून पाठिंबा काढून घेईल, असे स्पष्ट संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. संतप्त आमदारांच्या प्रतिक्रियेनंतर पाठिंबा काढून घेण्याचे संकेत उद्धव यांनी दिले असले, तरी बाहेर पाठिंबा देणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवसेनेचे मंत्री आणि प्रतोद यांची आमने-सामने बैठक
शिवसेनेच्या नाराज आमदारांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी बैठक बोलावली. शिवसेनेचे मंत्री आणि प्रतोद यांची आमने-सामने बैठक झाली. या बैठकीत आमदारांच्या तक्रारींवर शिवसेनेच्या मंत्र्यांची उद्धव ठाकरेंनी झाडाझडती घेतल्याची माहिती मिळते आहे.
शिवसेना आमदारांच्या मतदारसंघांची कामं होत नाहीत!
शिवसेनेचे विधान परीषदेतील मंत्री शिवसेनेच्याच आमदारांच्या मतदारसंघातील कामांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आमदारांनी तक्रार केली होती. सत्तेत असुनही शिवसेना आमदारांची कामं होते नाहीत. विशेष करून सुभाष देसाई आणि दिवाकर रावते या मंत्र्यांची तक्रार उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली होती.
सुभाष देसाई आणि दिवाकर रावतेंची तक्रार
या बैठकीत नाराज आमदारांचे प्रश्न विभागीय प्रतोदांनी उद्धव ठाकरे आणि मंत्र्यांसमोर मांडले. एकनाथ शिंदे, रामदास कदम यांच्याबद्दल आमदारांच्या तक्रारी नाहीत. मात्र, सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांच्याबद्दल आमदारांच्या तक्रारी असल्याचे प्रतोदांनी सांगितले.
देसाई-रावतेंनी मांडली स्वत:ची बाजू
त्यावेळी सुभाष देसाई यांनी त्यांचा कार्य अहवाल मांडला. मे 2016 च्या आधी शिवसेना आमदारांनी सांगितलेली सर्व कामे आपण केल्याचे सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले. दिवाकर रावते यांनी देखील स्वतःची बाजू मांडली.
उद्धव ठाकरे स्वत: कामांचा पाठपुरावा करणार
मंत्री आणि प्रतोद याच्यासोबत समोरासमोर चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील सर्व कामं त्यांच्या विभागीय प्रतोदांकडे देण्यास सांगितले. विभागीय प्रतोद आणि उद्धव ठाकरे स्वत: या कामांचा पाठपुरावा मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत.
शिवसेनेचे प्रतोद मतदारसंघातील कामांबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघातील कामांच्या संदर्भात शिवसेनेचे प्रतोद आणि मुख्यमंत्री यांची लवकरच एक बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेना आमदारांची कामं मार्गी लावण्यासाठी काय करता येईल, याबद्दलचा निर्णय होणार आहे.