मुंबई : शिवसेना आमदाराची मुजोरीची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. रेल्वेमध्ये साईड बर्थ मिळाला म्हणून नांदेडचे शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी सीएसटी स्टेशनवर गोंधळ घातला. इतकंच नाही तर त्यांनी सिकंदराबाद-देवगिरी एक्सप्रेस तब्बल एक तास रखडवून ठेवल्याचा आरोप होत आहे.


 

सीएसटी स्टेशनवरुन 9.10 मिनिटांनी निघणारी देवगिरी एक्स्प्रेस 10.06 मिनिटांनी सुटली. मात्र आमदार महाशयांच्या गोंधळामुळे ट्रेनमधील सुमारे 2000 ते 3000 प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

 

हेमंत पाटील यांच्यासोबत अन्य काही आमदार या धिंगाण्यात सहभागी होते. राज्य विधीमंडळाचं अधिवेशन बुधवारी संपलं. त्यामुळे मुंबईबाहेरील आमदारांची मतदारसंघात जाण्यासाठी लगबग उडाली.

 

हेमंत पाटील सिकंदराबाद-देवगिरी एक्सप्रेसमध्ये जवळपास 40 आमदार आपल्या कार्यकर्त्यांसह निघाले होते. या आमदारांसाठी रेल्वेने खास बोगी दिली होती. परंतु मनासारखी जागा मिळाली नाही, म्हणून हेमंत पाटील यांनी तब्बल एक तास गाडी रखडवल्याचा आरोप होत आहे.