मुंबई : कमळ चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या पुणे, सोलापूर येथील रिपाइं (ए) च्या उमेदवारांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. लोणावळा येथे झालेल्या आरपीआयच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत राज्य सरचिटणीस राजा सरवदे यांनी ही घोषणा केली.
आरपीआय आणि भाजप यांच्यात फक्त मुंबई महापालिकेसाठी युती करण्यात आली असून 9 महापालिकेत पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार आहे.
मुंबई सोडून अन्य 9 महापालिकेत आरपीआयने युतीचा प्रस्ताव भाजपला दिला होता. मात्र भाजपने त्या प्रस्तावावर निर्णय न घेता आरपीआयच्या उमेदवारांना परस्पर कमळ चिन्ह दिलं आहे.त्यामुळे आरपीआयची मुंबई वगळता अन्य 9 महापालिकेत भाजपशी युती तोडण्यात आली आहे.
पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार मुंबई वगळता अन्य 9 महापालिकेत रिपब्लिकन पक्ष स्वबळावर निवडणूक लढत असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.