मुंबई: निवडणुका आल्यावर यांना मुंबईची आठवण येते, यांना मुंबई जिंकायची आहे आणि ती स्क्वेअर फुटावर विकायची आहे, त्यामुळे मुंबईवर सध्या गिधाडं घिरट्या घालत आहेत, त्यांना आस्मान दाखवू असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. तुमचे कोणतेही डावपेच आता यशस्वी होणार नाहीत, आता काहीही करा असं थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांना दिलं आहे. 


केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी शिवसेनेसंबंधी केलेल्या वक्तव्याचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. शिवसेनेला जमीन दाखवा असं अमित शाह म्हणाले होते. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "यांना मुंबई विकायची आहे म्हणून केवळ निवडणुका आल्यावर मुंबईची आठवण येते. अमित शाह त्यापैकीच एक. त्यांना आम्हा आस्मान दाखवू."


महाराष्ट्रातले सगळे प्रकल्प गुजरातला 


उद्धव ठाकरे म्हणाले की, "महाराष्ट्रातले सगळे प्रकल्प गुजरातला नेले जातात. प्रकल्प गुजरातला न्यायचे आणि नंतर त्याला भरभरून आर्थिक मदत द्यायची. वेदांता महाराष्ट्रात येण्यासाठी केंद्राने सवलत का दिली नाही? दिल्लीत जाता तर मग पंतप्रधानांना ठणकावून का विचारत नाही?"


मुंबई जिंकायची म्हणजे काय? 


उद्धव ठाकरे म्हणाले की, "मुंबई जिंकांयचं म्हणजे नेमकं काय? मुंबई जिंकायची म्हणजे पहिला मुंबईकरांची मनं जिंकावी लागतात, ती शिवसेनेने जिंकली आहेत. मुंबईकरांच्या सुखदुखात शिवसेनेने सहभाग घेतला. भाजपला बदल करायचा आहे, मुंबई दिल्लीकरांच्या पायी घालायची आहे. पण ही मुंबई छत्रपती शिवरायांची आहे, ती झुकणार नाही."


मुंबईकरांचा श्वास म्हणजे शिवसेना असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.  न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीमध्ये लागणारा निकाल हा केवळ तुमच्या माझ्या आयुष्याचा नाही तर या देशात लोकशाही राहणार की नाही याचा आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. कायद्यासमोर सर्व समान आहेत, माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे असंही ते म्हणाले. 


हे फिरतं सरकार


एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "मी मुख्यमंत्री असताना कोरोना होता, त्यावेळी मी सर्वांना घरात बसायचं आवाहन करायचो. आताचं सरकार हे फिरतं सरकार आहे, सुरत, गुवाहाटी, दिल्ली असं नुसता फिरतं आहे. हे सर्व गद्दार असून येत्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवू."


तुम्हाला हीच बहिण मिळाली का? 


उद्धव ठाकरे हे खासदार भावना गवळी आणि नरेंद्र मोदी यांच्या रक्षाबंधनाचा संदर्भ देत म्हणाले की, ज्या महिलेवर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्याच महिलेकडून पंतप्रधानांनी राखी बांधून घेतली. सव्वाशे कोटी जनतेतून तुम्हाला ही एकच बहिण मिळाली का? ज्या व्यक्तीवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले, त्याच व्यक्तीकडून यांनी राखी बांधून घेतली."