Yashwant Jadhav : शिवसेना नेते यशंवत जाधव यांचा पाय आणखी खोलात गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. आयकर विभाग करत असलेल्या तपासात अनेक गोष्टींचा खुलासा झाला असून काही नवीन धागेदोरे तपासात आढळून आले आहेत. मागील 10 दिवसात यशवंत जाधव यांच्याविरुद्धच्या तपासाला वेग आला आहे. यशवंत जाधव यांनी काही ज्वेलर्सकडून 6 कोटींचे दागिने रोख रक्कम मोजून खरेदी केले असल्याचे समोर आले आहे. 


शिवसेनेचे मुंबईतील महत्त्वाचे नेते आणि मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष असलेल्या यशवंत जाधव यांच्या घरावर काही महिन्यांपूर्वी आयकर विभागाने छापा मारला होता. जानेवारी महिन्यात भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. मुंबईतील कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तसेच यामध्ये मनी लॉन्ड्रिंग केल्याचाही गंभीर आरोपही सोमय्यांनी जाधवांवर केला होता. त्यानंतर आयकर खात्याने जाधव यांच्या घरावर छापा मारला होता. त्यानंतर यशवंत जाधव यांच्याशी संबंधित 41 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. भायखळ्यातील 31 फ्लॅट्स आणि वांद्रेतील 5 कोटींचा फ्लॅट आयकर खात्याकडून जप्त करण्यात आला होता.  


रोख रक्कम देऊन 6 कोटींच्या दागिन्याची खरेदी 


यशवंत जाधव प्रकरणात आयकर खात्याच्या चौकशीत आणखी काही बाबी उघड झाल्या आहेत. गेल्या 10 दिवसांत तपासाला वेग आला आहे. जाधव यांच्या एकूण संपत्तींची संख्या आता 53 वर पोहचली आहे. यात कैसर बिल्डींगचा समावेश आहे. काळा पैसा पांढरा करण्यासाठी ही इमारत खरेदी करण्यात आली. या एकट्या इमारतीतून 80 कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार उघडकीस आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
गेल्या 10 दिवसांत आयकर खात्याने प्रत्यक्ष ठिकाणांवर जाऊन स्पॉट तपास करत खातरजमा केली आहे. या चौकशी दरम्यान काही व्यक्तींनी शपथेवर कबुलीनामा दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  यशवंत जाधव यांनी
काही ज्वेलर्सकडून 6 कोटींच्या दागिन्यांची खरेदी केली. ही खरेदी संपूर्ण रक्कम रोखीने करण्यात आली. यामध्ये एका मध्यास्थामार्फत 1.77 कोटींच्या दागिन्यांची खरेदी करण्यात आली होती. या व्यवहारातही रोखीने पैसे स्वीकारल्याची कबुली या संबंधित ज्वेलर्सने दिली आहे. 


त्याशिवाय बिलाकाडी चेंबर्समध्ये 3 खोल्यांचे टेनन्सी राईटस खरेदी करण्यासाठी यशवंत जाधव यांनी 1.15 कोटी रुपये रोखीने दिल्याचेही तपासात उघड झाले आहे.  कोरोनेशन बिल्डींग, झैनाब महाल आणि कैसर बिल्डींगमध्ये अचल संपत्ती हस्तांतरणासाठी 3 कोटींहून अधिक रक्कम रोखीने देण्यात आली असल्याचे समोर आले असून आणखी रोख रकमेच्या व्यवहारांचा तपास सुरू असल्याचेही सूत्रांनी सांगितले.